कुणाला अनुदान मिळाले नाही; तर कुठे कामेच अर्धवट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:28 AM2021-09-03T04:28:55+5:302021-09-03T04:28:55+5:30
समितीच्या सदस्यांनी पाच तालुक्यातील २१ ग्रामपंचायती अंतर्गत रोजगार हमी योजना तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांची ...
समितीच्या सदस्यांनी पाच तालुक्यातील २१ ग्रामपंचायती अंतर्गत रोजगार हमी योजना तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांची पाहणी केली. या कामांबाबतच्या अनेक त्रुटींकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष वेधल्याने ही समितीची कुणाची विकेट घेणार, अशी कुजबूज अधिकाऱ्यांच्या वर्तुळात पहिल्या दिवसापासूनच सुरू झाली आहे. समितीचे प्रमुख आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या अध्यक्षतेखाली २५ सदस्यांची चमू बुधवारी रात्री जिल्ह्यात आली. गुरुवारी उर्जानगरातील हिराई विश्रामगृहावर जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले यांच्यासह काही सदस्यांनी समितीच्या सदस्यांची भेट घेऊन ब्रह्मपुरी तालुक्यातील मनरेगा तसेच विविध कामांतील गैरव्यवहाराच्या तक्रारी केल्या. मनरेगाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची योग्य अंमलबजावणी झाली नाही. परिणामी, पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहिल्याचे गाहाणे मांडले.
जिवती प.सं. सभापती पवार यांनी वैयक्तिक लाभाच्या योजनांचे अनुदान प्रलंबित असल्याचा मुद्दा मांडला. पोंभुर्णा पं.स. सभापती अलका आत्राम यांनी मनरेगा कामात क्रीडांगणाचा विकास सामावून घेण्याची सूचना केली. रोजगार सेवकाच्या मानधन काढण्याच्या जुन्या पद्धतीत बदल करण्याची मागणीही लोकप्रतिनिधींनी केली. गावकऱ्यांनी रोहयो व मनरेगा कामांबाबत अडचणी समितीसमोर सांगितल्या.
जिल्ह्याचा फॅक्ट रिपोर्ट विधिमंडळात सादर करणार
समितीने बल्लारपूर तालुक्यातील कळमना, किन्ही, इटोली, गिलबिली, कोर्टीमक्ता, राजुरा तालुक्यातील सुमठाणा, सोनुर्ली, देवाडा, येरगव्हाण, कोरपना तालुक्यातील कठोली, माया, सोनुर्ली, भद्रावती तालुक्यातील चेकबराज, मागली, खोकरी (आग्रा), फाटा ते आग्रा, चंदनखेडा, आष्टा, वडाळा, वरोरा तालुक्यातील आनंदवन व भटाळा येथील कामांची पाहणी केली. रोपवाटिका, फळबाग लागवड, गुरांचा गोठा, वृक्षलागवड, बोडी खोलीकरण, अभिसरण, शोष खड्डे, गट लागवड, घरकूल, रस्ता दुतर्फा, स्मशानभूमी शेड बांधकामांचेही निरीक्षण करून नोंदी घेतल्या. याबाबतचा अहवाल विधिमंडळाला सादर केला जाणार आहे.
आमदारांचे चार पथक
आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या अध्यक्षतेखालील विधिमंडळ समितीमध्ये आमदार राजेश पाटील, आमदार नरेंद्र दराडे, आमदार अमोल मिटकरी, आमदार दादाराव केचे, आमदार रामदास आंबटकर, आमदार विक्रमसिंह सावंत, आमदार शिरीष चौधरी, आमदार समीर कुणावार, आमदार दिलीप बोरसे, आमदार राजेश राठोड व अन्य सदस्यांचा समावेश आहे. या समितीचे चार पथक तयार करण्यात आले. त्यानुसार दौरा करण्यासाठी तालुके निश्चित केली आहेत.
आज समिती कुठे जाणार?
शुक्रवारी १५ तालुक्यातील रोहयो व व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- महाराष्ट्र अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करणार आहे. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन योजनांची माहिती जाणून घेणार आहे.