कुणाचीच उपासमार होऊ देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 05:00 AM2020-04-01T05:00:00+5:302020-04-01T05:00:33+5:30
चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार हेदेखील उपस्थित होते. त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दोन लाख ११ हजार ८६३ रुपयाचा धनादेश पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या स्वाधीन केला. ना.विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही, ही बाब अतिशय सकारात्मक असून यासाठी आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन व स्वत:च्या घरात राहणाऱ्या जबाबदार नागरिकांचे मी कौतुक करतो. येणाºया काळामध्ये आणखी जागरूक राहून लॉकडाऊन पाळायचा आहे. या काळात कोणाच्याही घरी अन्नधान्याचा तुटवडा किंवा उपासमार होणार नाही, याची काळजी प्रशासनाच्या मदतीने मी घेतो. सर्वांनी राज्य शासनाच्या निदेर्शांचे पालन करावे, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
यावेळी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार हेदेखील उपस्थित होते. त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दोन लाख ११ हजार ८६३ रुपयाचा धनादेश पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या स्वाधीन केला. ना.विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या काटेकोर कामाचे कौतुक केले. मात्र एकीकडे लॉकडाऊन असताना कोणत्याच परिस्थितीत अन्नधान्याचा पुरवठा किंवा तयार अन्न पुरविण्याच्या प्रक्रियेतील त्रुटीमुळे उपासमार होणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली.
यावेळी ५ एप्रिलनंतर आपण स्वत: वैयक्तीकरित्या ३० हजार अन्नधान्याच्या किट ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, अशा लोकांना देणार असल्याचे स्पष्ट केले.
अन्य राज्यातील अनेक मजूर, कामगार रोजंदारी कर्मचारी बांधकामावर असणारे मजूर, छोट्या-मोठया उद्योगात काम करणारे मजूर, यांच्याकडे रेशन कार्ड नाही. मात्र रेशन कार्ड नाही म्हणून त्यांची उपासमार होता कामा नये, आपल्या राज्यातील अनेक ठिकाणी मजूर अडकून आहे. त्या त्या ठिकाणचे राज्यशासन त्यांची व्यवस्था करत आहेत.
यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव व अन्य मंत्र्यांशी आपले बोलणे झाले आहे. अन्य राज्यातील मजूर, प्रवासी व अडकून पडलेल्या सर्व नागरिकांची, विद्यार्थ्यांची कामगारांची, उपासमार होणार नाही. त्यांना योग्य मदत मिळेल, यासाठी यंत्रणेने काम करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनाने गेल्या काही दिवसात अतिशय संयमाने काम केल्याबद्दल त्यांचेही कौतुक केले. आतापर्यंत ६७ लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्याला मज्जाव करणे, आवश्यक असून जनतेने या काळात गरज नसताना बाहेर पडूच नये, असे आवाहन शेवटी त्यांनी यावेळी केले.
शंभर नागरिकांचे होम क्वारंटाईन पूर्ण
जिल्ह्यात आतापर्यंत बाहेर देशातून प्रवास करून आलेल्या शंभर नागरिकांचे होम क्वारंटाईन पूर्ण झाले आहे. ५३ नागरीक अद्याप निगराणीत आहे. आतापर्यंत पाठवलेल्या सगळ्यांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही. यासाठी आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन यांनी समन्वयाने सुरू केलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागाच्या समन्वयात सुरू करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षालादेखील भेट दिली. जिल्ह्यांच्या सीमा बंद झाल्या असून सर्व जिल्ह्यात त्या त्या ठिकाणी नागरिकांची उत्तम व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे अनावश्यक प्रवास टाळण्याचे त्यांनी आवाहन केले. सोबतच मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सढळ हस्ते मदत करावी. सर्व कृषी केंद्र व खतांचा पुरवठा करणारी दुकाने उघडी ठेवावी. शिवभोजन यंत्रणा तालुका स्तरावर सक्रीय करण्यात यावी. व्हॉट्स अॅपवरील खोटया संदेशापासून नागरिकांनी सावध रहावे, अशा सुचना ना. वडेट्टीवार यांनी यावेळी केल्या.
ग्रामीण लोकप्रतिनिधींनी पुढे यावे
शेतकरी, शेतमजूर, गरीब, निराश्रित, बेघर, विमनस्क अशा सगळ्या लोकांच्या रोजच्या भोजनाबाबत अधिक काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली. महानगरात काही स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत. मात्र ग्रामीण भागात गावागावातील सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी आपल्या परिसरात कोणी उपाशी राहणार नाही, यासाठी प्रशासनासोबत येऊन काम करावे, असे आवाहन ना. विजय वडेट्टीवार यांनी केले.
शाळेच्या शुल्कासाठी सक्ती करू नये
राज्यामध्ये १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्याने या कालावधीमध्ये शाळेची फी जमा करण्यातून सूट देणेबाबत राज्य शासनाने एक परिपत्रक काढून स्पष्ट केले आहे. राज्यातील कोरोना साथीची सध्याची परिस्थिती, लॉकडाऊन केल्यामुळे संपूर्ण हालचालीवर घालण्यात आलेली बंदी पर्यायाने नागरिकांना जाणवणारी पैशांची उपलब्धता या बाबी विचारात घेता सर्व बोर्डाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना विनंती करण्यात येते की, विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालू वर्षाची व आगामी वर्षाची फी गोळा करताना सहानुभूती दाखविणे आवश्यक राहील. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सदर फी जमा करण्याबाबत सक्ती करण्यात येऊ नये. लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतर शाळेची फी जमा करण्याबाबतच्या सूचना संबंधितांना देण्याची कार्यवाही करावी, अशी माहिती राज्य शासनाने परिपत्रक जारी करून दिली आहे.
आजपासून हॅलो चांदा सुरू
शहरात विविध सामाजिक संस्थांमार्फत सध्या भोजनदान चालू असून नागरिकांनी आपल्या अवतीभवती अशा पद्धतीने कोणाची उपासमार होत असल्यास महानगरपालिकेशी संपर्क साधावा. मालवाहतूक करणाºया वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या ०७१७२-२७२५५५ या क्रमांकावर फोन करावा उद्यापासून पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलोचांदा सुरू होत असून टोल फ्री क्रमांक १५५-३९८ वर दूरध्वनी करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
यंत्र खरेदीचे प्रस्ताव सादर करा
आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यांमध्ये सुरू केलेले प्रशिक्षण व घेत असलेली काळजी, तसेच आशा वर्करपासून तर आरोग्य उपकेंद्रात प्राथमिक केंद्रामध्ये काम करणाºया सर्व कर्मचाऱ्यांचे त्यांनी या काळातील कर्तव्याबद्दल आभार व्यक्त केले. पुढील अनेक दिवस हा लढा आपल्याला लढायचा असून उत्तमोत्तम आरोग्य सुविधा आपल्याला मिळाव्यात यासाठी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मदत व पुनर्वसन मंत्रालयामार्फत आवश्यक असेल असे कितीही यंत्र खरेदी करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचेही पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.