घोडाझरीचा ओव्हरफ्लोच नाही; पर्यटकांचा हिरमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 11:24 PM2017-08-25T23:24:27+5:302017-08-25T23:25:00+5:30
पूर्व विदर्भातील पर्यटकांचे आकर्षण ठरलेला घोडाझरी तलावाचा ओव्हर फ्लो यावर्षी मुश्कीलच दिसत आहे.
घनश्याम नवघडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : पूर्व विदर्भातील पर्यटकांचे आकर्षण ठरलेला घोडाझरी तलावाचा ओव्हर फ्लो यावर्षी मुश्कीलच दिसत आहे. गेल्या तीन वर्षांपासून घोडाझरी तलाव ओव्हर फ्लो होत नसल्याने पावसाळी पर्यटकांचा हिरमोड होत आहे, हे विशेष.
घोडाझरी तलावाची निर्मिती इंग्रजांनी १९०५ मध्ये केली. तीन बाजूला नैसर्गिक टेकड्या असल्याने एका बाजूला बांध घालून या तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. या तलावाची निर्मिती करताना परिसरातील शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था हा प्रमुख हेतू त्यावेळी असला तरी हल्ली मात्र सिंचनासोबतच घोडाझरी पर्यटनासाठी अधिक प्रसिद्ध पावले आहे.
एक उत्तम पर्यटनस्थळ म्हणून घोडाझरी पूर्व विदर्भात प्रसिध्द आहे. म्हणूनच नागपूर, भंडारा, गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटक घोडाझरीला वर्षभर येत असतात. पण या पर्यटनापेक्षाही आंनददायी असतो तो घोडाझरी ओव्हरफ्लो झाला की निर्माण होणारा नजारा. समोर विशाल तलाव, तलावाभोवतीची हिरवी गर्द वनराई, आणि सांडव्यावरुन फेसाळत पडणारे पाणी हे दृष्य खरोखचर विलोभनीय असेच असते. आणि या फेसाळलेल्या पाण्यात डुबकी मारून निसर्गाचा आनंद घेण्याची जी मजा असते, ती काही औरच असते.
हा योग यापूर्वी अनेकदा आला असला तरी २०१३ नंतर हा योग जुळून आलाच नाही. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे घोडाझरी तलाव ओव्हर फ्लोपर्यंत येत नाही. मागील वर्षी ओव्हर फ्लो होण्याची आशा निर्माण झाली होती. पण शेवटी पुरेसा पाऊस न झाल्याने ही आशा मावळली होती.
पावसाबाबत बोलायचे झाल्यास यावर्षी पावसाची मागील वर्षीपेक्षा दयनीय अवस्था आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी तलावात बरेच कमी पाणी आहे. दमदार पावसाचे दिवस निघून जात आहेत. त्यामुळे यावर्षीही घोडाझरीचा ओव्हर फ्लो जरा मुश्कीलच दिसत आहे.