एकही रुग्ण बाहेरून येता कामा नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 05:00 AM2020-04-11T05:00:00+5:302020-04-11T05:00:43+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला. यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील उपाययोजनांचा आढावा घेतला. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक घरातील नागरिकांच्या आरोग्यविषयक पाहणीचे त्यांनी कौतुक केले.

No patient should come from outside | एकही रुग्ण बाहेरून येता कामा नये

एकही रुग्ण बाहेरून येता कामा नये

Next
ठळक मुद्देजिल्हाभरात कडेकोट नाकेबंदी : प्रतीक्षेतील सहा अहवाल निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व प्रशासन अतिशय उत्तम पद्धतीने काम करत आहे. मात्र पुढील काळामध्ये चंद्रपूरमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची कसून तपासणी करा. एक, एक जिल्हा कोरोना मुक्त ठेवणे गरजेचे आहे. चंद्रपूर जिल्हासुद्धा या आजारापासून अलिप्त ठेवा. त्यासाठी कडेकोट लॉकडाऊन करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना दिले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला. यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील उपाययोजनांचा आढावा घेतला. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक घरातील नागरिकांच्या आरोग्यविषयक पाहणीचे त्यांनी कौतुक केले. अन्य राज्यांच्या सीमा असतानादेखील व आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असताना चंद्रपूरमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण नाही, ही बाब अतिशय समाधानाची असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र सोबतच जिल्ह्याच्या सीमा आणखी कडक करा. येणाºया प्रत्येक नागरिकाची नोंद ठेवा. त्याच्या आरोग्याची तपासणी करूनच त्याला प्रवेश द्या. पुढील काळात लॉकडाऊन अतिशय कडक पाळा, असे सक्त निर्देश त्यांनी यावेळी दिले.
जिल्हा आरोग्य अधिकारी राजेश गहलोत यांनी दिलेल्या वृत्तानुसार जिल्ह्यामध्ये शुक्रवारपर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. जिल्ह्यात विदेशातून व अन्य ठिकाणाहून आलेल्या २३ लोकांपैकी २२ नागरिकांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले आहे. यापैकी पुर्ण नमुने निगेटिव्ह आहेत. आतापर्यंत विदेशातून अन्य राज्यातून व अन्य जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची संख्या २६ हजार ६६३ आहे. यापैकी चार हजार ४८२ नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. आतापर्यंत २२ हजार १८१ नागरिकांनी १४ दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा कालावधी पूर्ण केला आहे. ग्रामीण भागातही मॉकड्रील घेण्यात आली. आकस्मिक काळात जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे यावरुन पुढे आले आहे. दरम्यान, १४ एप्रिलला लॉकडाऊन संपुष्टात येईल की आणखी वाढविली जाईल, याबाबत दोन दिवसात प्रशासनाकडून कळविण्यात येणार आहे.

जिल्ह्याबाहेरील व्यक्तींनी जिल्ह्यात येऊ नये
जिल्हाबाहेर अधिकृत परवानगी शिवाय कोणालाही सीमा ओलांडता येणार नाही. कोणालाही आत घेतले जाणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीचे धाडस संचारबंदीच्या काळामध्ये करू नये, असे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आज स्पष्ट केले आहे.

फिरणारी वाहने जप्त होतील
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पुन्हा रस्त्यावरील गर्दी वाढत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली असून नागरिकांनी घरीच राहण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहे. सोबतच रस्त्यावर फिरणारे दुचाकी व कोणतीही अन्य वाहने जप्त केले जातील, असे स्पष्ट केले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडूच नये, असे आवाहन केले असून विनाकारण फिरणाºयांवर सक्त कारवाई करण्याचे, निर्देश दिले आहे.

नागरिकांना सर्व सुविधा पुरविणार
नागरिकांनी जिल्ह्यात जाहीर करण्यात आलेल्या वेगवेगळ्या संपर्क क्रमांकाचा वापर करावा व त्याद्वारे योग्य ती माहिती मिळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व मोबाईल आॅपरेटर यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत एसएमएसद्वारे संपर्क क्रमांक पोहोचत असून आवश्यक मदतीसाठी या संपर्क क्रमांकांवर मदत घेण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. अन्य जिल्ह्यातील नागरिकांनी पुढील आदेशापर्यंत शेल्टर होम मध्येच राहावे. आपल्याला देण्यात येत असलेल्या सुविधा व निवारा व भोजनासंदर्भात जिल्हा प्रशासन रोज आढावा घेत असून त्यामध्ये कुठलीही कमतरता जाणवणार नाही ,असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय जिल्ह्याबाहेर राहणाºया नागरिकांनाही त्यांनी विनंती केली आहे की, पुढील आदेश होईपर्यंत जिल्ह्यात येण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रयत्न करू नये. सर्व जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या असून आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही व बाहेर देखील जाण्याची परवानगी दिली जाणार नाही, हे नागरिकांनी लक्षात घ्यावे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांसाठी ‘स्टडी अ‍ॅट होम’
संचारबंदीच्या पुढील कालावधीत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी विद्यार्थ्यांनी घरूनच अभ्यास करावा, यासाठी स्टडी अ‍ॅट होम उपक्रमाला जिल्ह्यात सुरुवात करणार असल्याची घोषणा केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर पुढील ३० दिवसांसाठी यासंदर्भात नियोजन करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद चंद्रपूर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. आगामी काळात याबाबत अधिक खुलासा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: No patient should come from outside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.