एटीएममध्ये ना सॅनिटायझर, ना सुरक्षा रक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 05:00 AM2020-08-05T05:00:00+5:302020-08-05T05:00:20+5:30
मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे खबरदार बाळगण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून दिल्या जात आहे. कोरोनाच्या भीतीने सामान्य नागरिकही सुरक्षा बाळगत असल्याचे दिसून येत आहे. मात्र दररोज हजारो ग्राहकांचा स्पर्श होणाऱ्या एटीएम केंद्रांचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे.
साईनाथ कुचनकार, परिमल डोहणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरातील एटीएम केंद्र कितपत सुरक्षित आहेत, यासाठी ‘लोकमत’ ने बुधवारी शहरातील एटीएम केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी अनेक धक्कादायक प्रकार बघायला मिळाले. एक-दोन एटीएम केंद्रांचा अपवाद वगळल्यास शहरातील बहुतांश एटीएममध्ये कोरोनाचा संसर्ग ेटाळण्यासाठी व्यवस्थाच नाही. नियमित स्वच्छतेचाच अभाव असल्याने एटीएम केंद्रातून कोरानाचा संसर्ग होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.
मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे खबरदार बाळगण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून दिल्या जात आहे. कोरोनाच्या भीतीने सामान्य नागरिकही सुरक्षा बाळगत असल्याचे दिसून येत आहे. मात्र दररोज हजारो ग्राहकांचा स्पर्श होणाऱ्या एटीएम केंद्रांचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे. शहरात स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बॅक ऑफ बडोदा, आयसीआयसी बँक, आयडीबीआय बँक यासारख्या राष्ट्रीयीकृत बँक आणि मध्यवर्ती सहकारी बँक, अर्बन बँक व अन्य खासगी बँकेचे एटीएम केंद्र आहेत. एकाही बँकेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा नाही. अपवाद म्हणून नागपूर रोडवरील स्टेट बँकेच्या एटीएमसमोर बादलीभर पाणी आणि साबण ठेवल्याचे बघायला मिळाले. जेटपूरा गेट परिसरात असलेल्या इंडस्लॅन्ड बँकेच्या एटीएमध्ये सुरक्षा रक्षकाच्या माध्यमातून येणाºया प्रत्येक ग्राहकांचे तापमान मोजमाप तसेच सॅनिटायझर देवून स्वच्छता बाळगली जात आहे. कस्तुरबा मार्गावरील स्टेट बँकेचे व छोटा बाजारातील आयसीआयसीआय, युनियन बँक, तुकूम येथील स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, बँक आॅफ इंडिया या बँकांच्या एटीएम केंद्रातही कोणतीही सुरक्षा बघायला मिळाली नाही. दिवसभर ग्राहक येत होते आणि बिनधास्त पैसे काढून निघून जात आहेत. काही ग्राहक तर साधा मास्कसुद्धा लावून नसल्याचे दिसून आले. सुरक्षा रक्षकसुद्धा नसल्याने सोशल डिस्टन्टिंगही धाब्यावर ठेवले जात आहे. असाच प्रकार सुरू राहिल्यास एटीएम केंद्रातून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्वच्छतेकडेही दुर्लक्ष
शहरातील एटीएम केंद्राची अवस्था फारशी चांगली नाही. एटीएम केंद्रातच स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. पैसे काढल्यावर काही ग्राहक हात पिरगळून तिथेच स्लिप फेकून देत आहे. अनेक केंद्रांमध्ये तर धुळ साचली आहे. देखरेखीकडे बहुतांश बँक व्यवस्थापनांनी दुर्लक्ष केले आहे. मात्र बँकांना ना कुणाची भीती ना नागरिकांच्या आरोग्याची काळजी असेच म्हणावे लागेल.
या बँकामध्ये घेतली जाते सुरक्षा
जेटपुरा गेट परिसरात असलेल्या इंडस्लॅन्ड बँकेमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा पाळली जात आहे. येथील सुरक्षारक्षक ये-जा करणाºया प्रत्येकांना सॅनिटायझरने हात धूवण्यास प्रोत्साहन देत आहेत. प्रत्येकांचे तापमानही मोजत आहेत. नागपूर मार्गावरील बाबपट नगर परिसरत असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएममध्येही खबरदारी पाळली जात आहे. या एटीएम केंद्राची इतर बंँकांनी अनुकरण करणे प्रत्येकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. अन्यथा भविष्यात एटीएममध्ये येणाºया प्रत्येकांना कोरोनाचा लागण झाल्यास नवल वाटू नये.
सीसीटीव्ही तपासण्याची गरज
कोरोनाच्या महामारीमध्ये बँकाच्या एटीएममध्ये सुरक्षा बाळगली जात नसली तरी येथील एटीएममध्ये मात्र सीसीटीव्हीद्वारे वॉच ठेवला जात आहे. त्यामुळे पैसा चोरीला जाण्याची भीती असलेल्या एटीएम केंद्रांना नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कसा, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
एटीएम सुरक्षेबाबत प्रशासनाचा गप्प
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानेद्वारे सामान्य नागरिकांना सुरक्षितता बाळगण्यासंदर्भात वेळोवेळी सांगत आहे. मात्र खुलेआम नियमांचा भंग करणाऱ्या या एटीएमच्या व्यवस्थापनाचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
एटीएम प्रवेशद्वाराविनाच
ऑनलाईन व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर एटीएमचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोनाच्या प्रादूर्भावामध्ये मात्र एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर आहे. खासगी बँकांच्या एटीएमचीही अशीच बिकट अवस्था आहे. काही एटीएममध्ये एटीएमचे प्रवेशद्वाराच तुटलेले असून स्वच्छतेचाही अभाव आहे.