ना शाळा, ना परीक्षा, साडेतीन लाख विद्यार्थी पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:19 AM2021-06-22T04:19:55+5:302021-06-22T04:19:55+5:30
चंद्रपूर : कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी शाळा बंद होत्या. त्यामुळे ना गृहपाट, ना चाचणी. एवढेच नाही तर परीक्षा न ...
चंद्रपूर : कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी शाळा बंद होत्या. त्यामुळे ना गृहपाट, ना चाचणी. एवढेच नाही तर परीक्षा न होताच पहिली ते बारावीपर्यंतचे जिल्ह्यातील तब्बल साडेतीन लाखांवर विद्यार्थी पुढच्या वर्गात जाणार आहेत. त्यामुळे मागील शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक वर्ष ठरले.
कोरोना संकटामुळे शाळा बंद होत्या. मध्यंतरी ५ ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यात आले. मात्र, त्यातही विद्यार्थ्यांची उपस्थिती अल्पच होती, तर प्राथमिकचे तर वर्गच भरले नाहीत. पहिलीच्या विद्यार्थ्यांनी तर शाळासुद्धा बघितली नाही.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १ हजार ५५७ शाळा, महापालिकेच्या ५९, समाजकल्याण विभागाच्या ५६, आदिवासी विभाग ६०, खासगी अनुदानितच्या ३७५, खासगी विनाअनुदानितच्या ३९१ शाळा आहेत. या शाळांमध्ये लाखो विद्यार्थ्यी शिक्षण घेत आहेत. मागील वर्ष कोरोना संकटात गेले. त्यामुळे शासनाने निर्णय घेऊन सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नत केले. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. हा अभ्यासक्रम शहरी भागातील विद्यार्थ्यांनी योग्य प्रकारे केला असला तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले. शासन निर्देशानुसार प्रथम ९ ते १२ वी, त्यानंतर ५ ते ८ वीपर्यंतचे वर्ग घेण्यात आले. मात्र, कोरोनाचा प्रकोप वाढल्यानंतर तेही बंद करण्यात आले. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी तर शाळेत पायसुद्धा ठेवला नाही. दरम्यान, विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना पुढील वर्गात वगोन्नत करण्यात आले. त्याप्रमाणे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून त्यांनाही उत्तीर्ण केले जाणार आहे.
बाॅक्स
जिल्ह्यातील जि. प. शाळा- १,५५७
खासगी अनुदानित शाळा - ३७५
बाॅक्स
पहिली - २८८२४
दुसरी - ३१२७२
तिसरी - ३१७८४
चौथी - ३३७१९
पाचवी - ३२८४५
सहावी - ३२३५७
सातवी - ३३१६१
आठवी - ३३४४१
नववी - ३२१४५
दहावी - ३३४४१
अकरावी - ३२३६०
बारावी - २८७८९
बाॅक्स
ऑनलाईन शिक्षणाचे फायदे
कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांना यावेळी प्रथमच ऑनलाईन शिक्षण देण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले. विद्यार्थ्यांनी घरीच अभ्यास पूर्ण केला. घरातच शिक्षण मिळाल्यामुळे कोरोनाचा धोका टाळता आला. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या-येण्याचा खर्च वाचला. शहरात मिळणारे दर्जेदार शिक्षण गावातील मुलांना देखील मिळाले. विविध विषय विद्यार्थ्यांना शिकायला मिळाले. नवीन शोध लावता आला.
ऑनलाईन शिक्षणाचे तोटे
प्रत्येक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसते. अशावेळी मोबाईल किंवा लॅपटॉप घेऊ शकत नाही. त्यामुळे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असते. काही विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात. काही ठिकाणी नेटवर्क समस्या असते. अशा वेळी त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. मोबाईल, संगणकासमोर जास्त वेळ बसल्यामुळे मुलांना डोळ्यांचे आजार उद्भवू शकतात. मोबाईलवर अभ्यास असल्यामुळे मुलांचे मन विचलित होऊ शकते. विद्यार्थी बेशिस्त होण्याची शक्यता असते. एकलकोंडे होण्याची भीती आहे.
बाॅक्स
शहर आणि गावात असे होते शिक्षण
मागील वर्ष ऑनलाईन शिक्षणात गेले. मात्र, विद्यार्थ्यांचा फायदा न होता तोटाच अधिक झाला. शहरी भागातील काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अभ्यास केला. मात्र, गरीब तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी या अभ्यासक्रमापासून बरेच दूर राहिले. त्यांना अभ्यासक्रमाबाबत काहीच कळले नाही. असे असतानाच आता ते पुढील वर्गात पोहोचले आहेत. त्यामुळे या वर्गाचा अभ्यास समजून घेताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यातच पुढील शैक्षणिक वर्षही कोरोनाच्या संकटात जाते की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.