अकरावीच्या प्रवेशाचे ‘नो टेन्शन’
By admin | Published: June 22, 2017 12:35 AM2017-06-22T00:35:26+5:302017-06-22T00:35:26+5:30
आठ दिवसांपूर्वी दहावीचा निकाल लागला. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षा जागा जास्त : शहरातील महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची अधिक पसंती
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आठ दिवसांपूर्वी दहावीचा निकाल लागला. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. विद्यार्थी विविध कागदपत्रांची जुळवाजुळव करीत आहेत. मोठ्या शहरांमध्ये अकरावीसाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असल्याने आपल्याला हवे त्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार की नाही, याबाबत विद्यार्थ्यांत चिंता पसरली आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात उलट स्थिती असून महाविद्यालयस्तरावर अकरावीला थेट प्रवेश दिला जात आहे. तर दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा प्रवेश क्षमता जास्त असल्याने अकरावीला प्रवेशाचे ‘नो टेन्शन’ असे म्हणण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे.
४४४
सध्या सर्वच अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे सर्वच शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी अकराव्या वर्गाचा प्रवेश महत्त्वाचा माणला जातो. त्यामुळे अनेक विद्यार्थी अकरावीत प्रवेश घेताना कला, वाणिज्य, कामर्स, विज्ञान अशा शाखांची निवड करतो. तर काही विद्यार्थी औद्योगिक प्रशिक्षणाला महत्त्व देतात. येथूनच विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवे वळण मिळत असते.
आठ दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या दहावीच्या शालांत परीक्षेत जिल्ह्यातून २६ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर जिल्हाभरात अकरावीचे २३४ कनिष्ठ महाविद्यालये असून २७० तुकड्या कला शाखेच्या, विज्ञान शाखेच्या १३८ तुकड्या, तर वाणिज्य शाखेच्या ३० तुकड्या आहेत. या तुकड्यांची प्रत्येकी ८० अशी प्रवेश क्षमता असून ३५ हजार २८० विद्यार्थ्यांना सहज प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांची शहरी भागाकडे धाव
दहावीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ग्रामीण भागात जास्त आहे. शहरी विद्यार्थ्यांच्या बरोबरीने अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांनी गुण मिळविले असून अकरावीच्या प्रवेशासाठी ते आता शहरातील महाविद्यालयांना पसंती देत आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी काहीसी अडचण निर्माण होत असून गुणानुक्रमे प्रवेश दिला जात असल्याचा प्रकार काही कनिष्ठ महाविद्यालयात सुरू आहे. प्रसिद्ध व चांगल्या महाविद्यालयात आपल्याला प्रवेश मिळावा, असे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असले तरी त्या महाविद्यालयात क्षमते इतक्याच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळते. तेव्हा अनेकांची हिरमोड होत आहे. ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयात मात्र वेगळी स्थिती आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांचा विविध क्षेत्राकडे कल
२० दिवसांपूर्वी बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला. त्यामुळे वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू आहे. यामध्ये अनेकांनी अभियांत्रिकी, कला, विज्ञान, आयटीआय, पॉलीटेक्नीक अभ्यासक्रमाची निवड केली असून प्रवेशासाठी तशी तयारी चालवली आहे. अनेकांचे प्रवेश निश्चीत झाले आहेत.
दहावीत उत्तीर्ण झालेल्यांपेक्षा अकराव्या वर्गाची जिल्ह्याची प्रवेश क्षमता जास्त आहे. मोठ्या शहरांमध्ये आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात महाविद्यालयस्तरावर थेट प्रवेश मिळत असल्याने प्रवेशासंबधी विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण नाही.
- संजय डोर्लीकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
जिल्हा परिषद, चंद्रपूर.