पणन महासंघाच्या कापूस खरेदीला एनओसीची आडकाठी
By admin | Published: November 26, 2014 11:02 PM2014-11-26T23:02:35+5:302014-11-26T23:02:35+5:30
राज्यात हमी भावाने कापूस उत्पादक पणन महासंघ कापसाची खरेदी करणार असल्याची घोषणा झाली. त्यामुळे पणन महासंघाने लगभग सुरू करीत जागेचा शोध घेणे सुरू केले. परंतु पणन महासंघाने
भाडे थकीत : जिनिंग संचालकांचा जागा देण्यास नकार
प्रविण खिरटकर - वरोरा
राज्यात हमी भावाने कापूस उत्पादक पणन महासंघ कापसाची खरेदी करणार असल्याची घोषणा झाली. त्यामुळे पणन महासंघाने लगभग सुरू करीत जागेचा शोध घेणे सुरू केले. परंतु पणन महासंघाने आजही अनेक खासगी जिनिंगचे थकीत भाडे अदा केले नसल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पणन महासंघास अनेक ठिकाणी कापूस संकलन केंद्राला जिनिंग मालकांनी नारहकत प्रमाणपत्र दिले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यभरातच पणन महासंघाला कापूस खरेदीचा शुभारंभ करता आला नाही.
कापूस उत्पादक पणन महासंघाने स्वत:चे जिनिंग नसल्याने राज्यात पणन महासंघ खासगी जिनींग भाड्याने घेऊन कापूस खरेदी करीत असते. ज्या जिनिंग सुरू आहे किंवा बंद आहे, अशा जिनिंग नाहरकत प्रमाणपत्र घेत असतात. अशा नाहरकत प्रमाणपत्राकरिता पणन महासंघ खासगी जिनिंग संचालकांना आॅक्टोबर महिन्यात पत्र पाठवित असते. आज दोन महिन्याचा कालावधी लोटूनही पणन महासंघास नाहरकत प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे पणन महासंघाची कापूस खरेदी या सत्रात सुरू होणार नसल्याचे दिसून येत आहे.
खासगी जिनिंग भाड्याने घेतल्यावर जागेचा किराया, कापसावर प्रक्रिया करण्याचे काम पणन महासंघ खासगी जिनिंग संचालकांवर सोपविते. हा किराया काढण्याकरिता खासगी जिनिंग संचालकांना मोठी पायपीट करावी लागते. यामुळे अनेक खासगी जिनिंगचे भाडे अजूनही पणन महासंघाकडे थकीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता पणन महासंघासमोर कापूस खरेदीकरिता लागणाऱ्या जागेचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.
पणन महासंघाकडे कापूस विकल्यास बोनस मिळतो. परंतु पणन महासंघाची खरेदी सुरू नाही. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांकडे कापूस विकल्यास बोनस मिळणार किंवा नाही, या संभ्रमावस्थेत कापूस उत्पादक शेतकरी सापडले आहेत. राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी राज्यात पणन महासंघाद्वारे कापूस खरेदीची घोषणा केली. त्यामुळे आजही अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरात ठेवला आहे. अगदी आतूरतेने ते पणन महासंघाच्या खरेदीची वाट बघत आहे. त्यामुळे अधिक दिवस कापूस घरात ठेवल्यास त्याचा सांभाळ कसा करावा व जोखीम कशी पत्करावी, असा प्रश्नही पणन महासंघाने कापूस खरेदी सुरू केली नसल्याने शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे.