अठ्ठावन्न नाही, पन्नास-आठ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 01:02 AM2019-06-22T01:02:49+5:302019-06-22T01:03:31+5:30
मुलांच्या मनातील गणिताची भीती दूर व्हावी, यासाठी इयत्ता दुसरीतील गणिताच्या पुस्तकात अचानक संख्यावाचनात केलेल्या बदलामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काहींनी अनुकूल तर काहींनी प्रतिकुल मत या बदलावर व्यक्त केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मुलांच्या मनातील गणिताची भीती दूर व्हावी, यासाठी इयत्ता दुसरीतील गणिताच्या पुस्तकात अचानक संख्यावाचनात केलेल्या बदलामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काहींनी अनुकूल तर काहींनी प्रतिकुल मत या बदलावर व्यक्त केले आहे. भाषा सौंदर्यावर जसा हा परिणाम करणारा बदल आहे, तसा व्यावहारिकदृष्ट्याही प्रतिकुल ठरेल अशी खंतही अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर हा नवा बदल घोकमपट्टीऐवजी समज वाढविणारा असल्याने स्वागतही झाले आहे. पारंपरिक संख्या वाचनाच्या पद्धतीतून अनेक पिढ्या शिकल्या आहेत. मग त्यांना जोडाक्षरे अन् गणिताची भीती नव्हती का? असा सवाल शिक्षकांचा आहे. गणिताची बडबड गीते आणि गाणे या पद्धतीमुळे नामशेष होतील. परिणामी, ही पद्धत भाषा सौंदर्यात कशी बसणार, अशी खंत काहींची असली तरी स्वागतही समपातळीवर आहे. नवी पद्धत दाक्षिणात्य असून इंग्रजीच्या धर्तीवर आहे. सुरुवातीला ही पद्धत प्रथमत: गोंधळाची वाटत आहे. परंतु, गणिती कल्पकतेला वाव देणारी आणि भाषा सौंदर्यावर शून्य परिणाम करणारी ठरेल, असा विश्वासही जिल्ह्यातील गणित विषय शिक्षकांनी व्यक्त केला आहे.
नवीन बदल झालेच पाहिजे
नवी पद्धत गणिती कल्पकतेला वाव देणारी आहे. सुरुवातीला गोंधळ वाटत असला ही पद्धत मुले सहजपणे आत्मसात करीत. चार वर्षांपूर्वी असा बदल करण्याची आवश्यकता मी विद्या प्राधिकरणाकडे सुचविला होता. अभ्यासक्रमात नवीन बदल झाले पाहिजे. हे बदल स्वीकारण्यास हरकत नसावी.
-अनिल माटे, जि.प. शाळा कावडगोंदी
यापूर्वी स्थानिक स्थळांचा वापर करून संख्यावाचन केले जात होते. आता संख्या वाचनाचे इंग्रजी भाषांतर आले आहे. नवीन अभ्यासक्रमातील बदल तांत्रिक आहे. ७२ म्हणणे अथवा सात दोन म्हणणे यात काही फरक पडत नाही. यातून मुलांच्या गुणात्मक विकासात कोणता बदल होणार हे कळायला मार्ग नाही.
- अनिल शिंदे, प्राचार्य, कला, वाणिज्य महाविद्यालय बल्लारपूर
वीस-दोन अशी संकल्पना विद्यार्थ्यांना आत्मसात करणे कठीण जाणार आहे. हा बदल करताना शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात आले नाही. गणिती कल्पकतेला चालना मिळेल, असे यात काहीच नाही. या बदलांचा मुख्य हेतू काय, हेही अद्याप स्पष्ट न झाल्याने शिक्षकांमध्ये संभ्रम वाढू शकतो. या बदलाचा पूनर्विचार व्हायला हवा.
- सुनील शेरकी, राष्ट्रमाता विद्यालय पोंभुर्णा
बालभारतीने गणितातील संख्येबाबत नवीन संकल्पनेचा विचार केला. त्यानुसार पाठ्यपुस्तके तयार केली आहेत. येत्या २६ जून रोजी शाळा सुरू असल्याने संख्या वाचनाविषयी घाईने बोलण्यात अर्थ नाही, असे मला वाटते. शिक्षकांनी नवीन पद्धतीनुसार शिकविल्यानंतर विद्यार्थी स्वीकारू अथवा गोंधळू शकतात. मात्र, शिकविण्यापूर्वीच हे दोन्ही निष्कर्ष काढणे अनाठायी आहे.
- मंजुषा डंभारे, जि. प. शाळा बोर्डा (बो.)
पारंपरिक पद्धतीनुसार अनेक पिढ्यांनी अंकवाचन शिकले आहे. त्यामुळे ही नवी पद्धत आणण्याचे कारण कळले नाही. अभ्यासक्रमात बदल व्हायलाच पाहिजे. परंतु विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार दुर्लक्षित होऊ नये. शास्त्रशुद्ध भूमिका असावी. शिक्षण क्षेत्रात नवीन संकल्पना अंमलात येत आहे. यात विद्यार्थ्यांचे अहित होऊ नये.
के. डब्लू. धोटे, मुख्याध्याक जि. प. शाळा बाखर्डी
गणिताच्या निर्मितीमागे संस्कृती लपली आहे. त्यामुळे असे प्रयोग करताना या पैलुचाही विचार केला पाहिजे. मराठीतील अनेक म्हणी गणिती भाषेतून आल्या आहेत. त्यामुळे मुलांवर पाश्चिमात्त्य विचार लादणे कदापि योग्य नाही. संख्या वाचनाचा बदल केवळ दुसरीसाठी झाला. तिसरी, चौथी व पाचवीत हा प्रकार नाही. त्यामुळे मुलांच्या आकलन क्षमतेत अडचणी येतील. भाषेची रसिकता संपेल. त्यामुळे बालभारतीने केलेला बदल गरजेचा वाटत नाही.
- प्रकाश कुमरे, जि.प. शाळा वरवट