स्वत:चे घर नाही, मुलांचे शिक्षण अद्यापही बाकी, मग स्वेच्छानिवृत्ती कशी घेणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:23 AM2021-01-04T04:23:55+5:302021-01-04T04:23:55+5:30
महामंडळातर्फे अत्यल्प वेतन मिळते. कोरोनामुळे तेही वेळेवर मिळेनासे झाले आहे. आर्थिक अडचणीमुळे कुटुंब चालविणे अवघड जाते. परिणामी ...
महामंडळातर्फे अत्यल्प वेतन मिळते. कोरोनामुळे तेही वेळेवर मिळेनासे झाले आहे. आर्थिक अडचणीमुळे कुटुंब चालविणे अवघड जाते. परिणामी अद्यापही अनेक कुटुंबे स्थिर झाली नाहीत. त्यातच महामंडळाने ५० वर्षे पूर्ण झालेल्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली आहे. मात्र स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर केवळ तीन महिन्यांचा पगार मिळणार आहे. एवढ्या तोकड्या पैशात कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणे शक्यच नाही. एकरकमी पैसा मिळाला, तरी तो घर, मुलांचे शिक्षण, नोकरी, व्यवसाय यांवर खर्च होणार. पुढील काळातील आर्थिक नियोजन करणे कठीण होणार आहे. महामंडळाच्या सेवेसाठी सेवानिवृत्तीपर्यंत वेळ मिळाल्यास जबाबदाऱ्या पूर्ण करता येतील. नोकरी नसल्याने अडीअडचणीच्या काळात कर्जही मिळणार नाही. या सर्व प्रश्नांनी वयाची ५० वर्षे पूर्ण झालेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांचा डोक्यात गोंधळ घातला आहे.
बॉक्स
स्वेच्छानिवृत्तीचा लाभ घेतल्यास काय मिळणार?
स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्यानंतर राहिलेल्या सेवेच्या प्रत्येक वर्षाकरिता तीन महिन्यांचे वेतन, भविष्यनिर्वाह निधी उपदान, रजा रोखीकरण, आदींचे लाभ, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अपराध प्रकरण प्रलंबित असल्यास अथवा एखादे गंभीर प्रकरण प्रलंबित राहिल्यास १५ दिवसांत निकाली काढले जाईल. महामंडळाच्या नियमानुसार मोफत कौटुंबिक पास मिळेल. राज्य शासनाच्या मान्यतेनंतर एस.टी. महामंडळात ही योजना कार्यान्वित केली जाणार आहे.
कोट
आर्थिक नियोजन कोलमडेल
मुलांचे शिक्षण, त्यांची नोकरी, व्यवसाय यासोबतच आई-वडिलांची जबाबदारी आहे. अद्यापही स्वत:चे घर नाही. नोकरी राहिल्यास आर्थिक नियोजन करणे शक्य होईल.
- बंडू मोरे
कोट
पाल्याला नोकरी द्यावी
सक्तीची सेवानिवृत्ती देताना किमान पाच महिन्यांचा पगार द्यावा. तसेच एवढ्या वर्षाची सेवा लक्षा घेता, कुटुंबातील एका व्यक्तीला शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी द्यावी.
- दत्ता बावणे, विभागीय सचिव