रस्ता नव्हे ही तर चिखलवाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:26 AM2021-09-13T04:26:14+5:302021-09-13T04:26:14+5:30
ब्रह्मपुरी : तालुक्यात येत असलेल्या पारडगाव - सोनेगाव रस्त्याची दुरवस्था झाली असून, पायी चालायलाही मार्ग नाही. त्यामुळे ही पायवाट ...
ब्रह्मपुरी : तालुक्यात येत असलेल्या पारडगाव - सोनेगाव रस्त्याची दुरवस्था झाली असून, पायी चालायलाही मार्ग नाही. त्यामुळे ही पायवाट आहे की चिखलवाट असा प्रश्न निर्माण होतो. सोनेगाव-चिमूर विधानसभा क्षेत्रात तर पारडगाव ब्रह्मपुरी क्षेत्रात येतो. त्यामुळे या रस्त्याचा विकास करण्यात आला नाही, असा आरोप नागरिक करत आहेत.
ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील ३२ गावांचा समावेश चिमूर विधानसभा क्षेत्रात करण्यात आला आहे. यापैकी अनेक गावे विकासापासून वंचित राहिली आहेत. त्यापैकी सावलगाव, सोनेगाव ही दोन गावे नदीतीरावर वसली आहेत. सोनेगाव ते पारडगाव रस्ता केवळ चार - पाच किमीचे अंतर आहे. सोनेगाववासीयांना आरमोरी, गांगलवाडी येथे जाण्यासाठी पारडगावावरून जाणे सोयीचे होते. वेळात व खर्चात बचत होते. म्हणून या मार्गाचा वापर नागरिक करतात. तालुका जरी ब्रह्मपुरी असला तरी या गावाचा समावेश चिमूर विधानसभामध्ये असल्यानेच या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे नागरिक आरोप करत आहेत. या रस्त्यावर चिखलमय वाट शिल्लक असून, कोणतेही वाहन चालविणे कठीण आहे. रस्त्याच्या कडेला झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्यामुळे ही वाटच दिसेनाशी झाली आहे.
120921\img_20210911_104235.jpg
सोनेगाव - पारडगाव रस्त्याची अशी दुरवस्था झाली आहे