‘नथिंग टू से’ आठ पारितोषिकासह प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 10:49 PM2018-12-30T22:49:45+5:302018-12-30T22:50:08+5:30
५८ व्या मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील घवघवीत यशानंतर नवोदिता संस्था चंद्रपूरच्या चमूने ६६ व्या कामगार राज्य नाट्य स्पर्धेच्या नागपूर विभागीय प्राथमिक फेरीत ‘नथिंग टू से’ या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट नाट्य निर्मितीच्या प्रथम पुरस्कारासह इतर आठ पारितोषिके पटकावत अंतिम फेरी गाठली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ५८ व्या मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील घवघवीत यशानंतर नवोदिता संस्था चंद्रपूरच्या चमूने ६६ व्या कामगार राज्य नाट्य स्पर्धेच्या नागपूर विभागीय प्राथमिक फेरीत ‘नथिंग टू से’ या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट नाट्य निर्मितीच्या प्रथम पुरस्कारासह इतर आठ पारितोषिके पटकावत अंतिम फेरी गाठली आहे.
२९ डिसेंबर रोजी रघुजी नगर नागपूर येथे कामगार कल्याण मंडळाच्या ललित कला भवनात पार पडलेल्या पारितोषिक वितरण समारंभात कामगार कल्याण केंद्र ललित कला भवन चंद्रपूर अर्थात नवोदिताच्या चमुने मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके स्वीकारली.
प्रसाद दाणी लिखित ‘नथिंग टू से’ या नाटकाला सांघिक प्रथम, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन प्रथम डॉ. जयश्री कापसे गावंडे, सर्वोत्कृष्ट स्त्री अभिनय प्रथम बकुळ धवने, सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनय द्वितीय जयंत वंजारी, पुरुष अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र राजेंद्र तुपे, सर्वोत्कृष्ट नेपथ्य प्रथम पंकज नवघरे, सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना द्वितीय हेमंत गुहे, सर्वोत्कृष्ट संगीत नियोजन द्वितीय अंकूश राजूरकर अशी एकूण आठ पारितोषिके प्राप्त झाली आहेत.
याआधी या नाटकाने ५८ व्या मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत निर्मितीच्या प्रथम पुरस्कारासह आठ पारितोषिके पटकावत अंतिम फेरी गाठली होतीे. आता कामगार राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरीसुद्धा गाठली आहे. विशेष म्हणजे, ‘नथिंग टू से’ या नाटकाची कथाही सुरेख असून सादरीकरणादरम्यान रसिकांना आपल्या जागेवर खिळवून ठेवण्यात कलावंत यशस्वी झाले होते.
बकूळ धवनेची हॅट्रीक
या नाटकातील प्रमुख कलावंत बकूळ धवने हिला कामगार राज्य नाट्य स्पर्धेच्या नागपूर विभागीय फेरीत सलग तीन वर्षे स्त्री अभिनयाचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला असून तिने हॅट्रिक साधली आहे. या नाटकाचे निर्माते अजय धवने, प्रशांत कक्कड असून सहनिर्माते आशिष अंबाडे आणि नूतन धवने हे आहेत. ‘नथिंग टू से’ या नाटकाच्या संपूर्ण टीमने अत्यंत ताकदीने आपल्या कलागुणांना स्पर्धेत प्रदर्शित केले होते.