सूचना फलकामुळे राजे विश्वेश्वरराव महाराजांचा पुतळा झाकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:27 AM2021-03-05T04:27:52+5:302021-03-05T04:27:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा हटविल्यावरून सध्या शहरात राजकीय तसेच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा हटविल्यावरून सध्या शहरात राजकीय तसेच सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. असे असतानाच चक्क महापालिकेने आझाद बागेजवळील राजे विश्वेश्वरराव महाराजांचा पुतळ्याच्या अगदीच समोर एक भला मोठा सूचना फलक लावून त्यांचा पुतळाच झाकला आहे. त्यामुळे येणाऱ्या- जाणाऱ्यांना येथे राजे विश्वेश्वरराव महाराजांचा पुतळा आहे, हे सुद्धा दिसत नाही. महापालिकेच्या या कृत्यामुळे नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे. चंद्रपूर शहरतील बहुतांश चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात महापुरुषांचे पुतळे आहेत. यामध्ये महात्मा गांधी, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी, मा. सा. कन्नमवार, महात्मा ज्योतिबा फुले, नेताजी सुभाषचंद्र बोस, बॅरी. राजाभाऊ खोब्रागडे, राजे विश्वेश्वरराव महाराज आदी महापुरुषांचा समावेश आहे. या पुतळ्यांच्या देखभालीची जबाबदारी महापालिकेची आहे. या महापुरुषांच्या पुतळ्यांमुळे त्यांचे विचार समाजातील प्रत्येक घटकांनी अवलंबावे, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर राहावा, हा उद्देश आहे. मात्र, चक्क महापालिकेनेच या महापुरुषांच्या पुतळ्याच्या अगदी समोरच फलक लावून आपला नाकर्तेपणा सिद्ध केला आहे.
बाॅक्स
नियमांची ऐसीतैसी
शहरात फलक लावण्यासाठी नियमावली आहे. मात्र, महापालिका वाट्टेल तिथे फलक लावून स्वत:च नियमांची ऐसीतैसी करत शहराचे विद्रुपीकरण करत आहे. महापालिकेकडून चक्क न्यायालयाच्या आदेशाचेच उल्लंघन होत आहे.
--------------------------
कोट
थोर पुरुषांचा सन्मान करणे महापालिका पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी शिकले पाहिजे. अशा पद्धतीने थोर पुरुषांचे पुतळे किंवा स्मारक होर्डिंग, बॅनरमुळे झाकली जात असतील तर इतर नागरिक त्यातून काय धडा घेतील, याचा विचार करावा. न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्वप्रकारचे होर्डिंग, बॅनर लावण्यावर बंदी आहे. मग महानगरपालिकेला यातून सूट आहे का?
- पप्पू देशमुख
नगरसेवक तथा गटनेते, मनपा, चंद्रपूर