चंद्रपूर येथील लॉयड्सचा पाणीपुरवठा पाटबंधारे विभागाने केला खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:15 PM2018-02-16T12:15:30+5:302018-02-16T17:11:02+5:30
घुग्घुस येथील लॉयड्स स्टील मेटल अॅन्ड एनर्जी लि. कंपनीचा पाणीपुरवठा अखेर पाटबंधारे विभागाने शुक्रवारी दुपारी खंडित केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : घुग्घुस येथील लॉयड्स स्टील मेटल अॅन्ड एनर्जी लि. कंपनीचा पाणीपुरवठा अखेर पाटबंधारे विभागाने शुक्रवारी दुपारी खंडित केला.
कंपनीला प्रदूषणावर आळा घालण्याच्या वारंवार सूचना करूनही उपयोग झाला झाली. अशातच काँग्रेसचे शहर सचिव महेश मेंढे यांनी विविध पातळीवर तक्रार करून केलेल्या पाठपुराव्याअंती मुंबई येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अंबलगण यांनी ७ फेब्रुवारी रोजी कंपनीला ४८ तासांचा क्लोजर नोटीस बजावला होता. आदेशाचे पालन न झाल्यास कंपनीला होणारा पाणी व वीज पुरवठा खंडीत करण्याचेही आदेशात नमूद केले होते. वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी होते वा नाही याची जबाबदारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चंद्रपूर येथील विभागीय कार्यालयावर होती. विभागीय कार्यालयाने येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता, एमआयडीसीच्या घुग्घुस उपविभागाचे उपअभियंता, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व घुग्घुस येथील एमएसईडीसीएलचे सहाय्यक अभियंता यांना कंपनीचा वीज व पाणी पुरवठा बंद करण्याबाबतचे पत्र पाठविले होते.
कंपनीला ४८ तासांत उत्पादन बंद करण्याचे आदेश मुंबई येथील वरिष्ठांनी बजावले होते. आदेशाचे पालन न केल्यास कंपनीला होणारा वीज व पाणी पुरवठा बंद करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या होत्या. आदेशाचे पालन होण्याची वाट बघितली. परंतु आदेश न पाळल्याने अखेर पाणी व वीज पुरवठा बंद करण्याबाबतचे पत्र संबंधित विभागाला दिले आहे.
- पी. एम. जोशी, विभागीय अधिकारी,
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने लॉयड्सबाबत पाठविलेले पत्र अद्याप वाचनात आलेले नाही. पत्र प्राप्त होताच त्यानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.
- अविनाश कुरेकार, कार्यकारी अभियंता,
महावितरण, चंद्रपूर.