आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:24 AM2021-04-05T04:24:53+5:302021-04-05T04:24:53+5:30
चंद्रपूर : वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० कामगारांना ७ महिन्यांचा पगार व दोन वर्षांपूर्वी लागू झालेले किमान ...
चंद्रपूर : वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० कामगारांना ७ महिन्यांचा पगार व दोन वर्षांपूर्वी लागू झालेले किमान वेतन द्यावे या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील ५५ दिवसांपासून डेरा आंदोलन सुरू आहे. जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही या कर्मचाऱ्यांना पगार देण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सर्व कंत्राटी कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. यापूर्वी प्रदीप खडसे व संगीता पाटील या दोन कामगारांचा थकीत पगार व मानसिक तणावामुळे मृत्यू झाला आहे. मात्र पगार देण्याविषयी तातडीने कार्यवाही करण्याऐवजी कामगारांना कामावरून काढण्याची नोटीस वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने लावली आहे. ही नोटीस देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेण्यात आला आहे. यामुळे कामगारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
सुरक्षारक्षक, कक्ष सेवक, सफाई कामगार इत्यादींच्या नावासह एक यादी ३ एप्रिलच्या रात्री शासकीय रुग्णालयातील अपघात विभागाच्या बाजूला असलेल्या ऑफिससमोर लावण्यात आली. आंदोलनकर्त्या कामगारांनी २४ तासाच्या आत कामावर रुजू व्हावे अन्यथा त्यांना कामावरून काढण्यात येईल, असा इशारा या नोटीसमध्ये देण्यात आला आहे. दरम्यान, वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्या या नोटीसबद्दल जनविकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख तसेच आंदोलनातील कामगारांनी संताप व्यक्त केला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन पगार देण्याबाबत ठोस निर्णय घेत नाही. मात्र कामगारांना कामावरून काढण्याची नोटीस देत आहेत. वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाची मुजोरी खपवून घेणार नाही. त्यांना योग्य भाषेत उत्तर देऊ, असे मत जनविकासचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी व्यक्त केले आहे.