धान संशोधन क्षेत्रात आता एका महिलेने टाकले पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2022 09:55 PM2022-10-23T21:55:41+5:302022-10-23T21:56:29+5:30
बारीक पोतीचे धान्य बाजारपेठेत उपलब्ध करण्यात विदर्भाच्या या मातीतील नागभीड तालुक्याचे फार मोठे योगदान आहे. कारण नांदेड येथील ‘’एचएमटी सोना’’ या धान वाणाचे प्रख्यात संशोधक दादाजी खोब्रागडे आणि ऊश्राळमेंढा येथील ‘’जय श्रीराम’’ धान वाणाचे जनक श्रीराम लांजेवार हे दोन संशोधक या तालुक्याने दिले आहेत आणि आता आसावरी पोशट्टीवार यांच्या रूपाने उच्च शिक्षित अशा महिला धान संशोधक म्हणून त्या पुढे आल्या आहेत.
राजेश बारसागडे
लोकमत न्यूज नेटवर्क
सावरगाव : क्षेत्र कुठलेही असो, एखाद्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करायची असेल तर मनुष्याला मुळातच प्रथम आवड निर्माण होणे किंवा असणे गरजेचे असते. तरच त्यात उंचीचे यश गाठता येते. अशाच एका क्षेत्रात जिथे केवळ पुरुषांचे योगदान राहिले आहे. त्या धान संशोधन क्षेत्रात आता एका महिलेच्या रूपाने अगदी शास्त्रोक्त पद्धतीची संशोधिका लाभली आहे. आसावरी नीलेश पोशट्टीवार असे त्यांचे नाव आहे. नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) येथील प्रसिद्ध धान उत्पादक शेतकरी अण्णासाहेब पोशट्टीवार यांच्या त्या स्नुषा आहेत.
खरं तर धान संशोधन क्षेत्रात अलीकडे फार मोठी क्रांती घडून आली आहे. बारीक पोतीचे धान्य बाजारपेठेत उपलब्ध करण्यात विदर्भाच्या या मातीतील नागभीड तालुक्याचे फार मोठे योगदान आहे. कारण नांदेड येथील ‘’एचएमटी सोना’’ या धान वाणाचे प्रख्यात संशोधक दादाजी खोब्रागडे आणि ऊश्राळमेंढा येथील ‘’जय श्रीराम’’ धान वाणाचे जनक श्रीराम लांजेवार हे दोन संशोधक या तालुक्याने दिले आहेत आणि आता आसावरी पोशट्टीवार यांच्या रूपाने उच्च शिक्षित अशा महिला धान संशोधक म्हणून त्या पुढे आल्या आहेत.
शेतीलाच प्रयोग शाळा मानणाऱ्या अण्णासाहेबांपासून प्रेरणा घेऊन त्यांच्या स्नुषा आसावरी यांनी पूर्वीचा कुठलाही अनुभव नसताना धान संशोधन कार्यात पाऊल ठेवले आणि स्वतःला संशोधन कार्यात झोकून देत अत्यंत बारीक निरीक्षणातून शास्त्रोक्त पद्धतीने त्यांनी अनेक बारीक, अत्यंत बारीक पोतीच्या, सुवासिक, लाल, काळ्या आदी धान वाणाची निर्मिती केली आहे आणि त्यांच्या या कार्याची पावती म्हणून एमएसएमई - डीआय आणि वल्ड वाईड फार्मकडून ‘’वल्ड इनव्हॉटर’’ हा अवॉर्ड त्यांना मिळाला आहे. या कार्यासाठी मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्राचे माजी वैज्ञानिक डॉ. शरद ई. पवार यांचे वेळीवेळी त्यांना गुरुतुल्य असे मार्गदर्शन लाभले. तसेच सासरे आणि पती यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे त्या सांगतात.
२० वर्षांपासून कार्य सुरू
तब्बल २० वर्षांपासून त्यांचे कुटुंबीय धान वाण संशोधन कार्यात खपत आहेत. मात्र, मागील पाच वर्षांपासून त्यांनी त्यांच्याच सहा एकर शेतातील प्रयोगशाळेत नवनवीन धान वाणाच्या जाती - प्रजाती निर्माण करण्यासाठी भरपूर कष्ट उपसले आणि शेतकऱ्यांना सकस, शुद्ध बियाणे कसे देता येईल. यासाठी प्रयत्न केले. त्या धान वाणाच्या रिसर्चसाठी एका बियाणाचे एक झाड घेतात आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या शुद्ध व्हेरायटीला सात वर्ष लागतात, असे त्यांचे म्हणणे आहे.
या वाणांची निर्मिती
सद्यस्थितीत शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्या संयुक्त प्रयत्नाने आसावरी यांनी तळोधी रेड - २५, निशिगंध, तळोधी हिरा - १२५, साईभोग, गणेश, चाफा, गुलाब, चिन्नोर - २७, पार्वती चिन्नोर, तळोधी हिरा - १३५, पार्वती सुत - २७, बासमती ३३-२, नीलम आदी धान वाणांची निर्मिती केली आहे. यातून तयार होणारा तांदूळ आज कर्नाटक, आंध्रप्रदेश, मराठवाडा, तेलंगणा या राज्यात प्रसिद्ध झाला आहे आणि मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःचे बियाणे स्वतः निर्माण करायला हवे व स्वतःच शास्त्रज्ञ बनायला हवे. महिलांनीसुद्धा कुठलीही लाज न बाळगता शेतीच्या संशोधन कार्यात पावले उचलावीत व या क्षेत्रात भरीव योगदान द्यावे.
-आसावरी पोशट्टीवार, संशोधक.