आता नगर परिषद क्षेत्रातही नागरिकांना हवा रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:29 AM2021-09-25T04:29:02+5:302021-09-25T04:29:02+5:30
घनश्याम नवघडे नागभीड : ग्रामीण भागातील मग्रारोहयोच्या धर्तीवर नगर परिषद क्षेत्रातही नागरिक रोजगाराची मागणी करू लागले आहेत. नागभीड नगर ...
घनश्याम नवघडे
नागभीड : ग्रामीण भागातील मग्रारोहयोच्या धर्तीवर नगर परिषद क्षेत्रातही नागरिक रोजगाराची मागणी करू लागले आहेत. नागभीड नगर परिषदेत समावेश असलेल्या बाह्मणीकरांनी नागभीड नगर परिषदेकडे रोजगाराची नुकतीच मागणी केली, हे याचे उदाहरण आहे. आतापर्यंत बाह्मणीतील ५६७ व्यक्तींनी रोजगाराची मागणी केली असल्याची माहिती आहे.
नागभीड नगर परिषद ही क वर्गातील नगर परिषद आहे. ११ एप्रिल २०१६ रोजी या नगर परिषदेची स्थापना झाली. नगर परिषदेसाठी आवश्यक असलेल्या लोकसंख्येचा मेळ जमविण्यासाठी आजूबाजूच्या नऊ ग्रामपंचायती या नगर परिषदेत समाविष्ट करण्यात आल्या. सुलेझरी, भिकेश्वर, चिखलपरसोडी, बोथली, बाह्मणी, डोंगरगाव, नवखळा, तुकूम या ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. नगर परिषदेत समाविष्ट होण्यापूर्वी या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील नागरिकांचे शेती आणि रोजगार हमीची कामे हेच उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. मात्र, नगर परिषदेत समावेश झाल्यापासून या गावातील नागरिकांना रोजगार हमीच्या कामापासून वंचित राहावे लागत आहे. परिणामी या नागरिकांच्या आर्थिक अडचणीत चांगलीच वाढ झाली असून, यातूनच रोजगाराची ही मागणी पुढे आली आहे. शेतीची कामे संपली की, या गावातील लोकांना कोणतीही कामे नसतात. नोव्हेंबर महिन्यापर्यंत शेतीची कामे चालतात; पण त्यानंतर या लोकांना रिकामेच राहावे लागते.
नागभीड नगर परिषद खेड्यांची मिळून बनली आहे. या खेड्यांमध्ये त्यावेळच्या ग्रामपंचायतींनी नियोजन करून तलाव खोलीकरण, नाला खोलीकरण, वृक्षलागवड, पांदण रस्ते आदी विविध बाबींवर रोजगार उपलब्ध करून दिला होता. असेच किंवा शासनाने क वर्गातील नगर परिषदांना रोजगार हमीच्या कामांबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नियोजन करून रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा प्रतिक्रिया यासंदर्भात व्यक्त होत आहेत. आता नगर परिषद या मागणीबाबत काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.
बॉक्स
रोहयोमधून रोजगार देण्याची तरतूद
नागभीड नगर परिषदेचा दर्जा ''क'' आहे. शासनाच्या एका निर्देशानुसार क वर्गात असलेल्या नगर परिषदांकडे कार्यक्षेत्रातील नागरिकांनी रोजगाराची मागणी केली तर रोहयोमधून रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे शासनाचे निर्देश आहेत. यासाठी काही मार्गदर्शक सूचनाही शासनाकडून देण्यात आहेत. या निर्देशाचा आधार घेऊनच बाह्मणीवासीयांनी ही मागणी केली आहे. नुसती मागणीच नाही तर ५६७ व्यक्तींनी नमुना फार्म क्रमांक ४ भरून दिले असल्याचेही समजते.