आता भात लागवडीचेही होणार यांत्रिकीकरण
By admin | Published: June 15, 2014 11:26 PM2014-06-15T23:26:56+5:302014-06-15T23:26:56+5:30
पारंपरिक रोवणी पद्धतीला फाटा देत आता जिल्ह्यातील शेतकरी यांत्रिकीकरणाद्वारे रोवणीचे काम करणार आहे. यासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणार असून हालचालिही सुरु झाल्या आहेत. प्रशिक्षणाचा पहिला
साईनाथ कुचनकार - चंद्रपूर
पारंपरिक रोवणी पद्धतीला फाटा देत आता जिल्ह्यातील शेतकरी यांत्रिकीकरणाद्वारे रोवणीचे काम करणार आहे. यासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणार असून हालचालिही सुरु झाल्या आहेत. प्रशिक्षणाचा पहिला टप्पा सावली तालुक्यातून सुरु करण्यात येणार आहे.
धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी धानाची शेती करतात. मात्र उत्पादन कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती असल्याने शेतकरी आता शेतीपासून दूर जात आहे. धान उत्पादक जिल्ह्याची ओळख यापूढेही कायम राहावी, शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात आर्थिक लाभ व्हावा यासाठी शासन तथा प्रशासन प्रयत्नरत आहे. मात्र त्यांचे हे प्रयत्न कधी नैसर्गिक आपत्तीमुळे तर कधी तांत्रिक अडचणीमुळे अपूरे पडत आहे.
भात लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. बांद्या बांधणे, चिखल करणे, सोबतच पऱ्हे टाकून ते पऱ्हे दोरीच्या सहाय्याने एका लाईनमध्ये रोवावे लागते. यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज असते. यात मजूरी जास्त आणि काम कमी होत असल्याने शेतकऱ्यांना ते परवडण्यासारखे नाही. सोबतच दिवसेंदिवस शेतमजूर मिळणे कठिण होत असल्याने रोवणीच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना शेतमजूर मिळविण्यासाठी धावपळ करावी लागते. आता मात्र पीपीपी-आयएडी या यंत्राच्या सहाय्याने रोवणी करणे शेतकऱ्यांना सोयीचे होणार आहे.
सदर यंत्र शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणार आहे.
यासाठी शेतकऱ्यांना प्रथम प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा पहिला टप्पा सावली तालुक्यातून सुरु करण्यात येणार आहे. यामाध्यमातून शेतकऱ्यांना रोवणीचे काम सुलभ होणार आहे.