आता मद्यप्यांची उत्कंठा शिगेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:20 AM2021-06-17T04:20:13+5:302021-06-17T04:20:13+5:30
सिंदेवाही : जिल्ह्यातील दारूबंदी झाल्यापासून बिअर बार, दारू दुकान, बिअर शॉपी बंद झाल्या. निर्बंध उठल्यानंतर दारू विक्री परवाना नूतनीकरण ...
सिंदेवाही : जिल्ह्यातील दारूबंदी झाल्यापासून बिअर बार, दारू दुकान, बिअर शॉपी बंद झाल्या. निर्बंध उठल्यानंतर दारू विक्री परवाना नूतनीकरण प्रक्रियेला सुरुवात होत असल्याने आता मद्यप्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. गावात सर्वप्रथम दारूची बाटली कोण विकत घेणार, याचीही गमतीदार चर्चा रंजकतेने केली जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील बंद असलेल्या दारू दुकानाच्या परवाना नूतनीकरण प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. शहरातील सिंदेवाही, लोनवाही परिसरात बिअर बार, दारू दुकान, बिअर शॉपी परवाने नूतनीकरणानंतर सुरू होणार आहेत; परंतु काही दारू विक्रेत्या मालकांनी चक्क हॉटेल, दुकान इमारतींसह विकून टाकले आहे. काहींनी इमारत बँकेला भाड्याने दिली आहे. काहींनी हॉटेल सुरू केले; तर काहींनी दारू दुकान परवाने भाड्याने दिले आहेत. त्यामुळे आता परवाना मिळताच कुणाचे दारू दुकान पहिले सुरू होणार व दारूची बाटली सर्वप्रथम कोण विकत घेणार, याची चर्चा मोठ्या गमतीने केली जात आहे. जवळजवळ सर्वच मद्यप्रेमी मंडळींची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.