महाविद्यालयातच मिळणार आता वाहन चालविण्याचा परवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:44 AM2019-07-20T00:44:05+5:302019-07-20T00:44:54+5:30
वाहन चालविण्यासाठी आवश्यक असलेले लर्निंग लायसन्स काढणे आता विद्यार्थ्यांना सोपे होणार असून महाविद्यालयांमध्येच शिबिराच्या माध्यमातून लायसन्स देण्यात येणार आहे. यासाठी परिवहन विभाग प्रत्येक महाविद्यालयांमध्ये शिबिर घेणार आहे.
साईनाथ कुचनकार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वाहन चालविण्यासाठी आवश्यक असलेले लर्निंग लायसन्स काढणे आता विद्यार्थ्यांना सोपे होणार असून महाविद्यालयांमध्येच शिबिराच्या माध्यमातून लायसन्स देण्यात येणार आहे. यासाठी परिवहन विभाग प्रत्येक महाविद्यालयांमध्ये शिबिर घेणार आहे. यापूर्वी मुंबई, कल्याण, नाशिक, चंद्रपूर, आणि नागपूर येथील परिवहन विभागाने हा प्रयोग यशस्वी केला. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही संकल्पना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
स्पर्धेच्या युगात प्रत्येकांच्या हाती दुचाकी, चारचाकी वाहने आली आहेत. शाळा, कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थीही यामध्ये मागे नाही. मात्र वाहन असले तरी बहुतांश विद्यार्थ्यांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतो. परिणामी एखाद्यावेळी दुर्घटना झाल्यास मोठी अडचण निर्माण होते. त्यामुळे प्रत्येक वाहनचालकांकडे वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक आहे. मात्र अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात.
पूर्वी परवान्यासाठी परिवहन कार्यालयामध्ये जाऊन अर्ज सादर करावा लागत होता. त्यानंतर कार्यालयाने दिलेल्या दिवशी जाऊन संगणकीय चाचणी प्रक्रिया पार पाडावी लागत होती. यामध्ये वेळ वाया जात होता. त्यामुळे परिवहन विभागाने वाहनचालकांना परवाना देण्यासाठी आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. ज्या दिवशी नंबर असेल त्या दिवशी कार्यालयात जाऊन संगणकीय चाचणी झाल्यानंतर लर्निंग लायसन्स देण्यात येत होते. मात्र यामध्येही अर्ज करणे, सांगितलेल्या दिनांकाला उपस्थित राहणे यामुळे ही प्रक्रिया विद्यार्थ्यांनसाठी त्रासदायक बनली होती. दरम्यान, दीड वर्षापूर्वी परिवहन विभागाने शिबिराच्या माध्यमातून परवाना वितरण करण्याचा कार्यक्रम आखला.
यामध्ये प्रथमदर्शी मुंबई, कल्याण, नाशिक, नागपूर आणि चंद्रपूर या कार्यालयाने यशस्वीरित्या शिबिर घेऊन विद्यार्थ्यांना वाहन चालविण्याचा परवाना वितरित केला. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.
त्यामुळे राज्यशासन तसेच परिवहन विभागाने आता राज्यातील प्रत्येक महाविद्यालयांमध्ये असे शिबिर आयोजित करून त्यामाध्यमातून विद्यार्थ्यांना लर्निंग लायसन्स देण्याची योजना आखली आहे. यामाध्यमातून विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडणार नसून वेळ आणि पैसाही वाचणार आहे.
असे आयोजित होणार शिबिर
परिवहन अधिकारी प्रत्येक महाविद्यालयांना पत्र देऊन महाविद्यालयाची परवानगी घेणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात येऊन एखादा दिवस ठरवून त्या दिवशी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. शिबिरामध्ये महाविद्यालयातील संगणकांचा वापर करण्यात येणार आहे. आता परिवहन विभागांकडे टॅब आले असून त्यामाध्यमातूनही शिबिरस्थळी परवाना प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांना होणार फायदा
अनेकवेळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी जिल्हास्तरावर किंवा परिवहन विभागाने ठरवून दिलेल्या तालुकास्तरावरील एखाद्यास्थळी जाऊन परवाना काढावा लागतो. यामध्ये त्यांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागतो. आता मात्र महाविद्यालयामध्येच लर्निंग लायसन्स परवाना मिळणार असल्याने त्यांनाही मोठा फायदा होणार आहे.