आता आषाढीतही शुभमंगल सावधान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:20 AM2021-07-16T04:20:22+5:302021-07-16T04:20:22+5:30
विवाह म्हणजे आयुष्याचा टर्निंग पाईंट असतो. ज्यांच्या आयुष्यात असे क्षण येतात ते कुटुंब, मित्र, आप्तेष्ट व नातेवाइकांच्या उपस्थितीत धूमधडाक्यात ...
विवाह म्हणजे आयुष्याचा टर्निंग पाईंट असतो. ज्यांच्या आयुष्यात असे क्षण येतात ते कुटुंब, मित्र, आप्तेष्ट व नातेवाइकांच्या उपस्थितीत धूमधडाक्यात साजरा करण्यावर भर देतात. मात्र, कोरोनामुळे विवाह सोहळ्याचे सारेच बदलले. जीवनाच्या सर्व क्षेत्रावर निर्बंध आले. कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आली. त्यामुळे जन्म, विवाह व मृत्यू या तिन्ही प्रसंगी किती लोकांची उपस्थित असावी आणि कोरोना प्रतिबंधाचे पालन कसे करावे, याबाबच्या सूचना प्रशासनाने दिल्या. खरे तर आषाढीत विवाह करणाऱ्यांची संख्या अत्यंत अल्प असते. चंद्रपूर जिल्ह्यात तरी कोरोनापूर्वी अशा प्रकारचे विवाह झाले नाहीत, अशी माहिती पंडित शुभम जोशी यांनी दिली. अनेकांनी मुहूर्त बघण्यापेक्षा बदलत्या परिस्थितीनुसार निर्णय घेऊन शुभमंगल मुलाच्या घरीच आटोपून टाकण्यावर भर दिला जात आहे. आषाढी असूनही बऱ्याच जणांनी मंगल कार्यालय बुक केल्याचे चंद्रपुरातील व्यावसायिक प्रशांत मोगे यांनी सांगितले.
आषाढात शुभ तारखा...
आषाढातही शुभ तारखा आहेत. काही कुटुंब या तारखांचा विचार करतात. मात्र, कोरोनामुळे परिस्थिती कधी बदलेल हे सांगता नाही. त्यामुळे मंगल कार्यालय मिळेल त्या तारखांमध्ये कमी वेळात विवाह कसा लागले, यालाच प्राधान्य देत आहेत.
-गंगाधर पत्की, पंडित तुकूम सुमित्रानगर चंद्रपूर
कोरोनामुळे प्रशासनाने नियम लागू केले. त्यामध्ये अजुनही मोठा बदल झाला नाही. निर्बंध कायम आहेत. पंचांगप्रमाणे विवाहाच्या तारखा सांगतो. पण, त्या तारखेपर्यंत काय होईल, याचीच धास्ती उपवर व वधूच्या कुटुंबात असते. अनेकांनी आता परिस्थितीला मान्य करून निर्णय घेत आहेत.
-पुरूषोत्तम कांत, पंडित विठ्ठल मंदिर वार्ड, चंद्रपूर
परवानगी ५० चीच, पण...
चंद्रपूर जिल्ह्यात विवाहप्रसंगी ५० व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. मंगल कार्यालय बुक करताना संचालक याची माहिती देतात. मात्र, विवाहप्रसंगातील गर्दी तपासणारी कोणतीही यंत्रणा मनपाने तयार केली नाही. त्यामुळे काही कुटुंब मंगल कार्यालय संचालकाला अतिरिक्त पैसे देऊन मोकळे होतात, हे वास्तव आहे. नियम ५० व्यक्तींचा असला तरी त्याहून जास्त पाहुण्यांची गर्दी असते.
मंगल कार्यालये बुक
आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे कुटुंब प्रतिष्ठेसाठी मंगल कार्यालय बुक करणाऱ्यावर भर देतात. मात्र, सर्वसामान्य कुटुंब ५० व्यक्तींच्या उपस्थितीत आपल्याच घरच्या अंगणात विवाह सोहळा करण्याला पसंती देत आहेत. यातून खर्चाचा बोजाही हलका होत आहे. परिणामी, मंगल कार्यालय बुक करणाऱ्यांचे प्रमाण कमी असल्याचे चंद्रपुरात दिसून येत आहे.