आता गृहकराची आकारणी भांडवली मूल्यांवर
By admin | Published: January 11, 2016 12:53 AM2016-01-11T00:53:57+5:302016-01-11T00:53:57+5:30
ग्रामपंचायत कर आकारणीतील बदल आणि न्यायालयाच्या स्थगितीमुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची मागील नऊ महिन्यात एक रुपयाही करवसुली होऊ शकली नाही.
नव्याने कर आकारणी : ग्रामपंचायत कर आकारणीवरील स्थगिती उठवली
राजकुमार चुनारकर खडसंगी
ग्रामपंचायत कर आकारणीतील बदल आणि न्यायालयाच्या स्थगितीमुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची मागील नऊ महिन्यात एक रुपयाही करवसुली होऊ शकली नाही. राज्य शासनाने इमारतीच्या क्षेत्रफळावरील आकारणी रद्द करून नव्याने भांडवली मुल्यावर कर आकारणी निश्चित केली आहे. त्यामुळे आता गृहकराची आकारणी क्षेत्रफळाऐवजी भांडवली मुल्यावर होणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना याचा चांगलाच फटका बसणार आहे.
ग्रामपंचायत गृहकराबाबत टाकण्यात आलेल्या जनहित याचिकेवरुन करावर न्यायालयाने स्थगिती दिली होती. ही स्थगिती नुकतीच उठविण्यात आली आहे. याबाबतचा ग्राम विकास विभागाचा आदेश संबंधित जिल्हा परिषदेत धडकला आहे. या निर्णयामुळे एप्रिल २०१५ पासून थांबलेल्या कर वसुलीला पुन्हा सुरुवात होणार आहे. शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे आता क्षेत्रफळाऐवजी भांडवली मुल्यावर कर आकारणी करण्यात येणार आहे. भांडवली मुल्यावर कर आकारणी करताना शासनाने सुरुवातीच्या काळात ती सध्याच्या काही पटीने वाढविण्यात येणार असल्याचा आराखडा प्रसिद्ध केला होता. त्यानंतरच्या सुधारित आराखड्यात कर आकारणी फक्त दुप्पट ते चार पट होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शासनाने २ जानेवारी २०१६ रोजी आदेश काढून नेमकी किती आकारणी होणार, हे त्यात स्पष्ट केले होते. भांडवली मुल्यावर आकारणी करताना इमारतीचा घसारा या किमतीतून वजा करण्यात येणार आहे. त्या समितीची मार्गदर्शक तत्वेही त्यात सांगितली आहेत. इमारतीचे भांडवली मुल्य काढताना इमारतीच्या क्षेत्रफळ, जमिनीचे वार्षिक मुल्यदर, इमारतीच्या प्रकारानुसार आकारणी, घसारा, इमारतीचा घरघुती, व्यावसायिक आणि वाणिज्य वापरासाठीचे निर्देशांक गृहीत धरण्यात येणार आहेत. यासाठी भूमिअभिलेख विभागात रेडीरेकनरचा वापर करण्यात येणार असून यासाठी अधिकाऱ्यांपासून ग्रामसेवकांनाही चांगलीच कसरत करावी लागणार आहे.