आता घाई काळ्या आईला हिरवा शालू नेसविण्याची !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:19 AM2021-06-19T04:19:40+5:302021-06-19T04:19:40+5:30

नितीन मुसळे सास्ती : काळी आई म्हणजे बळीराजासाठी जीव की प्राण. जगाचा पोशिंदा काळ्या आईच्या कुशीतूनच एका दाण्याचे ...

Now hurry to wear green shawl to black mother! | आता घाई काळ्या आईला हिरवा शालू नेसविण्याची !

आता घाई काळ्या आईला हिरवा शालू नेसविण्याची !

Next

नितीन मुसळे

सास्ती : काळी आई म्हणजे बळीराजासाठी जीव की प्राण. जगाचा पोशिंदा काळ्या आईच्या कुशीतूनच एका दाण्याचे हजार दाणे उगवितो. म्हणून आता बळीराजा काळ्या आईला पुन्हा एकदा हिरवा शालू नेसविण्यासाठी आतुर झाला होता. मृग बरसून पावसाने जोरदार हजेरी लावली आणि थोडी उसंत मिळाल्याबरोबर सुरू झाली शेतकरीदादाची लगीनघाई. मोठ्या उत्साहात सोयाबीन पेरणीची लगबग सुरू झाल्याचे चित्र ग्रामीण भागात पहायला मिळत आहे.

काळी आई हेच शेतकऱ्याचे जगण्याचे साधन आहे. उन्हाळा सुरू असताना सूर्यनारायण आग ओकत होता. मात्र जगाची चिंता वाहणारा हा पोशिंदा शेतात घामाने ओथंबलेल्या शरीराने हिरवे स्वप्न उराशी बाळगून काळ्या आईची मशागत करण्यात व्यस्त झाला होता. लॉकडाऊनच्या काळात नागरिक घरी कूलर लावून पडले असताना जगाचा पोशिंदा मात्र उन्हातान्हात तहानभूक विसरून काळ्या आईला हिरवा शालू नेसविण्यासाठी आतुर झाला होता. कधी एकदाचा तिला शालू नेसवितो आणि शेतात धान्याचे कोठार पिकवितो अशी आस त्याला लागलेली आहे.

उन्हाची फिकीर न करणारा बळीराजा बियाण्यांसाठी मात्र वणवण भटकतो. रोहिणी नक्षत्र सुरू झाले की बियाण्यांसाठी त्याची धावपळ सुरू होते. मृग उलटून जाऊ नये म्हणून तो बियाणे खरेदी करतो. मात्र बियाणे घेताना त्याला नागविले जाते. बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण करून त्यांच्याकडून जादा पैसे उकळण्यात येतात. त्याला हव्या त्या वाणाचे बियाणे मिळण्यास अडचण निर्माण होते. शेतीशीवाय पर्याय नसल्याने त्याला चढ्या भावाने बियाणे खरेदी करावे लागते. अशा परिस्थितीत त्याला बियाण्यांसाठी व खतासाठी कर्ज घ्यावे लागते तर कधी घरातील दागदागिने गहाण ठेवावे लागतात. काळ्या आईवर त्याचा भरवसा असतो. तीच आपल्याला यातून तारणार असा त्याला दृढ विश्वास असतो.

बाराही महिने शेतात कष्ट करणारा शेतकरी बांधव येत्या खरीप पिकाच्या तयारीला लागला. भर उन्हात शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करून चातक पक्ष्याप्रमाणे पावसाची वाट पाहत होता. दररोज वातावरण बदलत होते. आभाळाच्या पोटात मृगाचा गर्भ वाढत होता. उन्हाने तापलेली काळी आई पहिल्या पावसाच्या सरी अंगावर घेण्यासाठी व्याकूळ झाली होती. वातावरणातील बदलाने बळीराजाची लगबग वाढत होती. अशातच यावर्षी मृग वेळेवरच बरसला.

बॉक्स

सततच्या पावसामुळे खोळंबल्या होत्या पेरण्या

सतत सुरू असलेल्या पावसामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. परंतु आता पावसाने उसंत दिल्यानंतर खरिपासाठी तयार असलेल्या काळ्या आईवर अखेरचा हात फिरवून सरकी टिबण्याचे तसेच सोयाबीन पेरण्याचे काम जोरात सुरू झाले. ग्रामीण भागात ठिकठिकाणी उत्साही वातावरणात शेतकरीदादा सहकाऱ्यांसोबत कामात मग्न दिसून येत आहे. पडणारा पाऊस हंगामाच्या शेवटपर्यंत अशीच साथ देवो, अशी आस उराशी बाळगून शेतकरी शेतात राबताना दिसत आहे.

Web Title: Now hurry to wear green shawl to black mother!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.