आता मोबाईल ॲप लावणार वाहनांच्या अपघातांना ब्रेक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:18 AM2021-07-05T04:18:06+5:302021-07-05T04:18:06+5:30
चंद्रपूर : वाढत्या रस्ते अपघातांवर शास्त्रीय उपाय शोधण्यासाठी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने इंटीग्रेटेड रोड ॲक्सिडेंट डेटाबेस (आयआरएडी) हा ...
चंद्रपूर : वाढत्या रस्ते अपघातांवर शास्त्रीय उपाय शोधण्यासाठी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने इंटीग्रेटेड रोड ॲक्सिडेंट डेटाबेस (आयआरएडी) हा ॲप सुरु केला आहे. या ॲपच्या माध्यमातून अपघाताचे शास्त्रीय कारण शोधून आयआयटी चेन्नईद्वारे त्याचे विश्लेषण करण्यात येणार आहे. त्यामुळे वाढत्या अपघाताला ब्रेक लागणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ३२ पोलीस ठाण्यातील पोलिसांकडून या ॲपचा वापर सुरु केला आहे. अपघात झाल्यानंतर बऱ्याचवेळा अपघाताचे कारण, वाहन मालकांचा शोध लागत नाही. मृतकांची ओळख पटत नाही. आयआरएडी ॲपद्वारे रस्ते अपघाताची माहिती संकलित करुन तत्काळ कार्यवाही होणार आहे. त्यामुळे निश्चितच रस्ते अपघातांना आळा बसणार आहे. चेन्नईच्या आयआयटी विभागाने या ॲपची निर्मिती केली आहे. या प्रकल्पामध्ये पोलीस, परिवहन विभाग, आरोग्य व रस्ते महामार्ग विभागाची प्रमुख जबाबदारी राहणार आहे. यासंदर्भातील प्रत्येक पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ॲपमध्ये अपघाताची संपूर्ण माहिती त्यासंबंधित अहवाल अंतर्भूत असणार आहे. या अहवालाची जोडणी थेट सीसीटीएनएस आणि ऑनलाईन एफआयआरशी केली जाणार आहे. त्यामुळे वाढते अपघात रोखण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. पोलीस विभाग, आरटीओ, वाहतूक पोलिसांनी या ॲपवर काम सुरु केले आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते महामार्गाकडूनसुद्धा लवकरच या ॲपवर काम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
बॉक्स
आतापर्यंत १०६ अपघातांची नोंद
आयआरएडी प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात आलेल्या प्रकल्पाची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. पूर्वी या ॲपमध्ये केवळ ७५ दिवसांपूर्वीच्या अपघाताची माहिती भरण्यात येत होती; मात्र आता १ जानेवारी २०२१ पासूनच्या अपघाताची माहिती भरण्यात येणार आहे. जिल्ह्यात सन २०२१ मध्ये ३१९ अपघात झाले आहेत. त्यापैकी १०६ अपघातांची नोंद या ॲपमध्ये करण्यात आली आहे.
बॉक्स
असे चालणार काम
अपघात झाल्यानंतर त्याची माहिती तपास अधिकारी या ॲपमध्ये नोंद करतात. हे ॲप सारथीशी जोडलेले असल्याने वाहनाचा क्रमांक किंवा चालकाचा परवाना क्रमांक टाकल्यास त्याविषयीची सविस्तर माहिती तपास अधिकाऱ्यास मिळते. ज्या रस्त्यावर अपघात झाला. तो रस्ता ज्याच्या अखत्यारित येत असेल त्यांच्याकडून त्या ॲपमध्ये माहिती भरणे गरजेचे आहे.
बॉक्स
प्रत्येक ठाण्यातील एक अधिकारी व तीन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
आयआरएडी ॲपचा वापर कसा करायचा यासंदर्भात जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमधील एक अधिकारी व तीन पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ज्या ठाण्याच्या हद्दीत अपघात झाला असेल त्यांनी ठाण्यातील प्रशिक्षित अधिकारी किंवा कर्मचारी सदर अपघाताची माहिती आयआरएडी ॲपवर भरणार आहे.