गेल्या कर्जमाफीपेक्षा आता लाभार्थी संख्या घटणार
By admin | Published: June 13, 2017 12:30 AM2017-06-13T00:30:02+5:302017-06-13T00:30:02+5:30
जिल्ह्यात १ लाख १७ हजार ३४९ शेतकऱ्यांकडे ७४१ कोटी ४६ लाख ८ हजार रुपयांचे कर्ज आहे.
जिल्हा बँक : ६० हजार अल्पभूधारक थकबाकीदार
मिलिंद कीर्ती । लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात १ लाख १७ हजार ३४९ शेतकऱ्यांकडे ७४१ कोटी ४६ लाख ८ हजार रुपयांचे कर्ज आहे. मात्र, शेतकरी नेते व उच्चाधिकार मंत्रिगटाच्या चर्चेमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांंना तातडीने कर्जमाफी देण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून कर्ज घेतलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या ६० हजार ५४७ आहे. २००८ मध्ये कर्जमाफी मिळालेल्या अल्पभूधारकांपेक्षा यावेळी कर्जमाफीचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये घट होणार आहे. त्यात तब्बल ३१ हजार ३८४ शेतकऱ्यांची घट होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारच्या उच्चाधिकार मंत्रिगटाने चर्चेअंती घेतलेल्या निणर्याचा आदेश निघण्यास वेळ आहे. त्यामध्ये कर्जमाफीचे निकष स्पष्ट केले जातील. अल्पभूधारक शेतकऱ्यांना यावर्षीचेही कर्ज माफे केले जाईल, अथवा नाही, याबाबत स्पष्टता आलेली नाही. ती शासकीय आदेश आल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता असलेल्या लाभार्थी अल्पभूधारक शेतकऱ्यांची माहिती गोळा करणे सुरू केले आहे. जिल्हा बँकेप्रमाणे राष्ट्रीयकृत बँका व ग्रामीण विकास बँकेनेही पीक कर्जाचे वितरण केले आहे. तिन्ही बँकांनी कर्ज वाटप केलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची अंतिम आकडेवारी तयार करण्यात येत आहे.
गेल्या वेळी ९२ हजार लाभार्थी
यापूर्वी २००८ मध्ये सरकारने कर्जमाफी दिली होती. त्यावेळी जिल्हा बँकेच्या ९२ हजार ३१ अल्पभूधारक कर्जदार सभासदांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला होता. परंतु गेल्या नऊ वर्षांत कर्ज घेणाऱ्या अल्पभूधारक सभासदांची संख्या कमी झाली आहे. परिणामी नवीन कर्जमाफीचा आदेश आल्यानंतर जिल्हा बँकेच्या ६० हजार ५४७ अल्पभूधारक कर्जदार सभासदांना लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. लाभार्थी संख्या घटली असली तरी माफीची रक्कम गेल्या वेळीपेक्षा अधिक आहे. २००८ मध्ये सरकारने १५३ कोटी ५३ लाख रुपये माफीचा लाभ दिला होता. तो आता २७२ कोटी ६९ लाख रुपये मिळण्याची शक्यता आहे.