इरईला वाचविण्यासाठी आता जनआंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 10:13 PM2019-03-20T22:13:32+5:302019-03-20T22:13:46+5:30
चंद्रपूर शहराची जीवनदाहीनी अशी ओळख असलेल्या इरई नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. एवढेच नाही तर, झुडपे तसेच पात्र उथळ झाल्याने नदीचा नाला झाला आहे. या जीवनदाहीनीची गंभीर अवस्था झाली असून मागील काही वर्षांमध्ये शासनाकडून सौंदर्यीकरण, खोलीकरण करण्याचे आश्वासन दिले जात आहे. मात्र अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याने आता इरई बचाव समितीने इरईला वाचविण्यासाठी जनआंदोलन उभारण्याची तयारी सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहराची जीवनदाहीनी अशी ओळख असलेल्या इरई नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. एवढेच नाही तर, झुडपे तसेच पात्र उथळ झाल्याने नदीचा नाला झाला आहे. या जीवनदाहीनीची गंभीर अवस्था झाली असून मागील काही वर्षांमध्ये शासनाकडून सौंदर्यीकरण, खोलीकरण करण्याचे आश्वासन दिले जात आहे. मात्र अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याने आता इरई बचाव समितीने इरईला वाचविण्यासाठी जनआंदोलन उभारण्याची तयारी सुरू केली आहे.
इरईला वाचविण्यासाठी इरई बचाव जनआंदोलनने मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु केले आहे. मागील वर्षी नदीच्या पुन्नरोजीवनासाठी पदयात्रा, बैठा सत्याग्रह आंदोलन केले. एवढेच नाही तर मागील वर्षी जलसंपदा दिनाचे औचित्य साधून येथील महात्मा फुले चौक ते दाताळा पुलापर्यंत अनवानी पायाने पदयात्रा काढली. त्यानंतर इरई नदी पात्रात दिवसभर बैठा सत्याग्रह करून नदीच्या रुंदीकरणाचे काम रेटून धरले. त्यानंतर हळुहळू या नदीच्या पात्राचे रुंदीकरण तसेच इतर कामे करण्यात येत आहे. मात्र पाहिजे तशी गती आजही आली नसून काही वर्षांमध्ये या नदीचे भविष्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता जनआंदोलनने नागरिकांमध्ये जनजागृती करणे सुरु केले असून या नदीचे त्वरित खोलीकरण, सौंदर्यीकरण तसेच अतिक्रमण हटवून नदीपात्र खुले करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात इरई बचाव जनआंदोलन चंद्रपूरचे संयोजक कुशाब कायरकर तसेच इतरांनी प्रशासनाला निवेदनही दिले आहे.