आता प्लास्टिमुक्त चंद्रपूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 06:00 AM2020-02-06T06:00:00+5:302020-02-06T06:00:35+5:30
मागील तीन वर्षात मनपाद्वारे स्वच्छतेसाठी मोठया प्रमाणावर प्रयत्न झाले आहेत. स्वच्छ भारत २०१९ स्पर्धेत मनपा कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनी चंद्रपूर शहराने देशातून २९ वा क्रमांक मिळविला होता. यावर्षीही केलेल्या स्वच्छता मोहिमेद्वारे आपले शहर अग्रक्रमात येण्याची शक्यता आहे. मात्र या स्वच्छता मोहिमेत नागरिकांचा सहभाग अजूनही पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. आपल्या घरासारखे शहर स्वच्छ ठेवण्याची मानसिकता अजूनही रुजली नाहीये.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहर स्वच्छतेच्या बाबतीत थोडेफार सुधारले आहे. चौकाचौकात घाणीचे साम्राज्य दिसत नाही. मात्र जोपर्यंत प्लास्टिकचा वापर होत राहणार, तोपर्यंत शहर स्वच्छ व स्मार्ट होणार नाही. त्यामुळे प्लास्टिकबाबत मनपा प्रशासन अतिशय गंभीर झाले आहे. सिंगल यूज प्लास्टिक शहरातून हद्दपार करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. येत्या तीन महिन्यात चंद्रपूर शहर सिंगल यूज प्लास्टीकमुक्त शहर करण्यात येणार आहे. या संदर्भात मनपात बुधवारी तातडीची बैठक घेण्यात आली. सिंगल यूज प्लास्टिकचा वापर बंद करण्याच्या दृष्टीने या बैठकीत गंभीर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला महापौर राखी कंचर्लावार, आयुक्त संजय काकडे व विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.
मागील तीन वर्षात मनपाद्वारे स्वच्छतेसाठी मोठया प्रमाणावर प्रयत्न झाले आहेत. स्वच्छ भारत २०१९ स्पर्धेत मनपा कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनी चंद्रपूर शहराने देशातून २९ वा क्रमांक मिळविला होता. यावर्षीही केलेल्या स्वच्छता मोहिमेद्वारे आपले शहर अग्रक्रमात येण्याची शक्यता आहे. मात्र या स्वच्छता मोहिमेत नागरिकांचा सहभाग अजूनही पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. आपल्या घरासारखे शहर स्वच्छ ठेवण्याची मानसिकता अजूनही रुजली नाहीये. रोज शहर स्वच्छ केल्यावरही प्लास्टिक पन्नी मोठया प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे आता कठोर कारवाई करण्याचे निर्देश महापौर राखी कंचर्लावार व आयुक्त संजय काकडे यांनी यावेळी दिले. याप्रसंगी उपमहापौर राहुल पावडे, नगरसेवक रवी आसवानी, देवानंद वाढई, उपायुक्त गजानन बोकडे, सहायक आयुक्त सचिन पाटील, शीतल वाकडे, धनंजय सरनाईक व मनपा अधिकारी उपस्थित होते.
शासकीय अध्यादेशाला तिलांजली
शासकीय अध्यादेश २३ मार्च २०१८ नुसार एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तु उदा. ताट, वाटी चमचे, भांडी, कप ग्लास, स्ट्रॉ, हॉटेल्समधून अन्नपदार्थाच्या पॅकेजींगसाठी वापरले जाणारे लहान मोठे कंटेनर्स, प्लास्टिक बॅग्ज इत्यादीवर बंदी आहे. तरीही चंद्रपुरातील काही दुकानदार प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर करताना दिसून येत असल्याने त्यांच्या विरोधात मनपाने जप्ती मोहीम सुरू केली आहे. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा दृष्टीने शहरातील विविध दुकानांवर, पानठेल्यांवर मोठया प्रमाणात कारवाई करण्यात येणार आहे.
जनजागृतीचाही परिणाम नाही
मनपातर्फे सिंगल यूज प्लास्टिकबाबत बेटर चांदा मोहीम, क्रॉकरी बँक, शहरात विविध ठिकाणी तसेच जुन्या पुस्तक विक्रीच्या दुकानात जनजागृती बोर्ड, प्लॉग रन, सायकल रॅली, प्लास्टीकच्या मोबदल्यात मोफत बाह्य रुग्ण तपासणी, प्लास्टीक संकलन केंद्रे, कचऱ्यातून भेटवस्तू, स्वच्छता दिंडी, प्लास्टिक पन्नीचा वापर न करण्यासंबंधी पानटपरी चालकांकडून स्वयंघोषणापत्रावर स्वाक्षरी अशा विविध मोहिमांद्वारे जनजागृती केली मात्र यानंतरही पातळ प्लास्टिक पिशव्या, पन्नीचा वापर सुरूच आहे.