आता रेल्वे तिकिटाचे आरक्षण करता येणार ६० दिवसांआधी, तिकिटांचा काळाबाजार वाढण्याची भीती !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 02:03 PM2024-10-22T14:03:04+5:302024-10-22T14:04:14+5:30
Chandrapur : प्रवशांनी व्यक्त केली नाराजी
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : ऐन दिवाळी आणि पर्यटन हंगामाच्या तोंडावर रेल्वे मंत्रालयाने आरक्षणासाठीचा कालावधी १२० दिवसांवरून ६० दिवसांवर आणून प्रवाशांना धक्का दिला आहे. रेल्वेने तिकीट बुकिंगच्या नियमात बदल केले आहेत. या नियमानुसार आता १२० दिवस आधी नव्हे तर केवळ ६० दिवस आधी रेल्वेचे तिकीट बुकिंग करता येणार आहे. १ नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयाविषयी प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
प्रवाशांच्या म्हणण्यानुसार रेल्वेचे आरक्षित तिकीट आताच मिळत नाही तर ६० दिवसांच्या निर्णयामुळे आणखी "वेटिंग" वाढेल. यातून आणखी रेल्वे तिकिटांचा काळाबाजार फोफावणार आहे.
रेल्वेचे तिकीट १२० दिवस म्हणजे चार महिने आधी बुक करण्याच्या सुविधेमुळे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन खूप अगोदर करणे शक्य होते. त्यामुळे रेल्वेचे तिकीट आरक्षित करणे सोयीचे होते; परंतु नव्या निर्णयानुसार ६० दिवसांची कालमर्यादा ठरविण्यात आली आहे. यामुळे तिकीट बुकिंगसाठी झुंबड उडेल. कारण रेल्वे प्रवासाचे नियोजन हे ६० दिवसातच करावे लागेल. ऐन दिवाळीच्या हंगामात घेतलेला निर्णय हा प्रवाशांना फटका देणारा असून रेल्वे प्रशासनाने यावर तोडगा काढणे आवश्यक आहे.
१२० दिवसच कायम राहावा
"रेल्वेचे आरक्षण करण्यासाठी १२० ऐवजी ६० दिवसांपर्यंत कालावधी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे रेल्वे तिकिटांचा अधिक काळाबाजार होणार आहे. सर्वसामान्य प्रवाशांच्या सुविधेसाठी हा निर्णय मागे घेतला पाहिजे. रेल्वेचे आरक्षण करण्याचा कालावधी १२० दिवसच कायम राहावा."
- जयकरणसिंग बजगोती, माजी डीआर यूसीसी सदस्य, बल्लारपूर.
"हा निर्णय चुकीचाच ६० दिवसानंतर कुठे जायचे असेल तर नियोजनच करता येणार नाही. रेल्वेचे आरक्षण, हॉटेल आदींचे बुकिंग करता येणार नाही. त्यामुळे प्रवास ढकलावा लागेल. त्यामुळे रेल्वेचे आरक्षण पूर्वीचेच ठेवावे."
- अतुल भांबोरे, जनाधार अधिवक्ता संघ
"तारखेनुसार नियोजन ज्या तारखेनुसार जायचे असेल, त्यानुसार तिकिटाचे नियोजन करावे लागेल. याचा त्रास पर्यटनाला जाणाऱ्यांना होणार, यामुळे वेटिंग वाढेल. त्यामुळे आरक्षणाचा सध्या असलेला कालावधी कायम ठेवावा."
- विवेक खुटेमाटे, सामाजिक कार्यकर्ता, बल्लारपूर.