महिला पोलिसांसाठी आता ‘She Van’ प्रसाधनगृह
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 12:27 PM2023-06-17T12:27:30+5:302023-06-17T12:31:39+5:30
जुन्या वाहनाच्या वापरातून निर्माण केले फिरते प्रसाधनगृह
चंद्रपूर : जिल्ह्यात विविध सण, उत्सव, यात्रादरम्यानचे बंदोबस्त तसेच व्हीआयपी, व्हीव्हीआयपी दौरा, सभा बंदोबस्त आणि अनेक प्रसंगी उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीच्या बंदोबस्तात महिलापोलिस अधिकारी व अंमलदार यांची नियुक्ती करण्यात येते. नियुक्तीच्या ठिकाणी स्वच्छतागृह नसल्याने महिलापोलिसांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. दरम्यान, ही बाब लक्षात येताच पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी जुन्या चारचाकी वाहनाचे नूतनीकरण करून त्यात दोन टॉयलेट आणि एक वॉशरूमसह पाणी व फॅनची व्यवस्था असलेली एक ‘शी व्हॅन’ फिरते प्रसाधनगृहाचे निर्माण केले.
जिल्ह्यातील महिला पोलिस नागरिकांची सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिवसभर कर्तव्यावर असतात. बंदोबस्तादरम्यान कर्तव्यावर तैनात असलेल्या महिला पोलिसांना वेळीच प्रसाधन उपलब्ध होत नाही. स्वच्छतागृहांचा त्रास बंदोबस्ताच्या वेळी महिला पोलिस अधिकारी व अंमलदारांसाठी अधिकच उग्र होतो. पुरुष अंमलदार तरी कुठे आडोशाला जाऊन लघवी करून घेतो, मात्र, महिलांनी त्यातही गणवेशातील महिला पोलिसांनी कुठे जायचे, असा थेट प्रश्न पडतो आणि बंदोबस्तादरम्यान नैसर्गिक विधींना अवरोध केल्याने त्याचे दूरगामी परिणाम महिलांवर होऊन त्यांच्या युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनचे प्रमाण वाढीस लागतात. कारण अनेकदा कर्तव्यादरम्यान लघवी लागू नये, म्हणून महिला पोलिस पाणी पिण्याचेदेखील टाळतात. त्यामुळे पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी महिला पोलिसांच्या आरोग्यावर याचा परिणाम होऊ नये, म्हणून कोणत्याही प्रकारच्या मोठ्या बंदोबस्ताच्या वेळी कर्तव्यावरील महिला पोलिसांना नैसर्गिक विधी पार पाडण्यासाठी एक अभिनव उपाययोजना म्हणून ‘शी व्हॅन’ तयार केली आहे. उद्घाटनाप्रसंगी चंद्रपूर पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, प्रिती रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, पोलिस उपअधीक्षक मुख्यालय राधिका फडके तसेच मोटार परिवहन विभागाचे पोलिस निरीक्षक सुरेश आस्कर आणि मॅकेनिक स्टाफ आणि अनेक महिला पोलिस अंमलदार हजर होत्या.
दोन टाॅयलेट व एक वॉशरूमची व्यवस्था
पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी फिरत्या प्रसाधनगृहाच्या निर्माणाकरिता पोलिस मोटार परिवहन विभागातील एक जुन्या चारचाकी वाहनाचे नूतनीकरण करून त्यात दोन टॉयलेट आणि एक वॉशरूमसह पाणी व फॅनची व्यवस्था असलेली एक ‘शी व्हॅन’ फिरते प्रसाधनगृहाचे निर्माण केले आहे. सदर महिला पोलिसांसाठी तयार केलेले ‘शी व्हॅन’ फिरते प्रसाधनगृह यापुढे जिल्ह्यातील विविध बंदोबस्ताच्या वेळी महिला पोलिसांच्या सुविधेसाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे महिला पोलिसांसाठी स्वच्छतागृहाचा प्रश्न सुटून त्यांच्या आरोग्य स्वस्थ राहील आणि स्त्रीचे आरोग्य स्वस्थ असेल तर ती शारीरिक व मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत होईल. पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी सदर फिरते प्रसाधनगृहाचे निर्माण केले आहे.