आता सट्ट्याचा कहरही थांबावा !
By admin | Published: April 2, 2015 01:33 AM2015-04-02T01:33:40+5:302015-04-02T01:33:40+5:30
ब्रह्मपुरी तालुक्यातील बहुतांश गावामध्ये ‘सट्टा’ व्यवसायाने कहर केला आहे. दिवसेंदिवस या प्रकाराचा चांगलाच जम बसत आहे.
मधुकर मेश्राम ब्रह्मपुरी
ब्रह्मपुरी तालुक्यातील बहुतांश गावामध्ये ‘सट्टा’ व्यवसायाने कहर केला आहे. दिवसेंदिवस या प्रकाराचा चांगलाच जम बसत आहे. सर्रासपणे चालणाऱ्या या व्यवसायावर पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने अनेक सुखी कुटुंब सट्ट्यामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे सध्या तेजीत असलेल्या सट्टा व्यवसायाने सामान्य नागरिकांचे संसार उघड्यावर आणले आहेत.
तालुक्यातील पिंपळगाव (भो), नांदगाव, अऱ्हेरनवरगाव भालेश्वर, सोंदरी, चिखलगाव, लाडज, बेलगाव, तोरगाव, कोल्हारी देऊळगाव, नान्होरी, दिघोरी, कन्हाळगाव आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘सट्टा’ व्यवसाय चालतो.
पिंपळगाव (भो) येथे सहा ते आठ एजंट असून ते सार्वजनिक स्थळी, ग्रामपंचायत कार्यालयासमोर, पान टपरीवर बसून पट्टी कापतात. सायंकाळ झाली की ते पट्टी घेऊन जातात. पोलीस विभागाच्या डोळ्यात धूळ झोकून राजरोसपणे चालणाऱ्या सट्ट्याने श्रमाविना पैशाच्या हव्यासापोटी शेतकरी, शेतमजूर, शासकीय कर्मचारी, महिलांसह लहान शाळकरी मुले व नागरिकांना अक्षरश: वेड लावले आहे. सट्ट्याच्या नादी लागणाऱ्या सट्टाबाजांना नेहमी स्वप्न दिसतात. सट्टयाच्या जगात वावरणाऱ्या जुगाऱ्यांना स्वप्नांचे वेगळेच महत्त्व वाटते. या व्यतिरिक्त दिसेल त्या परिस्थितीत आकड्यांचा मेळ घालून लाभ घेण्याचा प्रयत्न सुरू असतो. प्रेतयात्रा दिसली तर (०) ओपन, साप दिसला तर नऊ (९), स्वप्नात पाण्याचा झरा दिसला तर पंजा (५) लावण्यात येतो.
काही भागात ओपन-क्लोज कोणती झाली, यासाठी विविध शब्दांचा वापर करतात. आठ म्हणजे लंगडा, नऊ- नागोबा, सहा- छगन, पाच- काँग्रेस अशा शब्दांचा वापर केला जातो तर काही एक ते दीड तास गणित करून आकडा काढतात.
या ‘सट्टा’प्रेमींना लाभ मिळून देण्यासाठी साप्ताहिक पेपरची निर्मिती करण्यात आली आहे. ते पूर्ण हप्त्याचे आकडे ओपन व नेट दिले जात असल्याने काही साप्ताहिकांचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मूठभर धनिकांसाठी आजच्या घडीला लाखो व्यक्तींचे संसार उद्ध्वस्त होताना निदर्शनात येत आहे.
कुठलाही पुरावा नसताना फक्त चिटोऱ्याच्या भरवशावर लाखोचा व्यवहार अत्यंत गांभीर्याने व ईमानइतबारे केला जातो. यात कसलाही दगाफटका केला जात नाही. इतक्या काटेकोरपणे लाखोचा अवैध व्यवसाय शिस्तबद्ध पद्धतीने कसा चालतो, ही एक बाब अंतर्मुख करणारी व पोलिसांच्या कर्तव्यावर शंका उपस्थित करणारे आहे. आता चिटोऱ्याऐवजी दूरध्वनी तसेच मोबाईलचा वापर होत असल्याचे परिसरात दिसून येत आहे. ग्रामीण भागातील जुगारबाजांकडे अजूनही २० वर्षांपासूनचे सट्ट्याचे दस्ताऐवज उपलब्ध असल्याचे दिसून येते. कोणता आकडा कधी लावायचा यासाठी या दस्ताऐवजाचा उपयोग होत असल्याचे सांगण्यात येते. तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात बिनधास्तपणे सट्टा व्यवसाय सुरू आहे.
घरबसल्या पैसा कमाविण्याच्या उद्देशाने शेकडो तरुणवर्ग सट्टा व्यवसायाकडे वळले आहेत. पोलिसांनाही ‘दक्षिणा’ मिळत असल्याचे नागरिकांच्या चर्चेवरुन समजते. गावोगावी एजंट निर्माण झाल्याने दिवसागणिक सट्टा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत होत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या शासनाने जिल्ह्यात दारूबंदी केली आहे. ती लागूही झाली आहे. आता अवैध चालणाऱ्या सट्ट्यावरही वेळीच प्रतिबंध घालावा, याकरिता ब्रह्मपुरीचे ठाणेदार नगराळे यांनी गांभीर्याने लक्ष घालून कारवाईची मोहीम आरंभावी, अशी मागणी परिसरातील नागरिक व महिलामंडळींकडून केली जात आहे.