आता प्रत्येक महाविद्यालयात स्थापन होणार ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट सेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:32 AM2021-07-14T04:32:50+5:302021-07-14T04:32:50+5:30
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली सन २०१२पासून कार्यरत आहे. दुर्गम व जनजाती क्षेत्रात असलेले हे विद्यापीठ या भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक ...
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली सन २०१२पासून कार्यरत आहे. दुर्गम व जनजाती क्षेत्रात असलेले हे विद्यापीठ या भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास करण्याकरिता स्थापन झाले होते. पण, विद्यापीठाची रचना व सुरुवातीला धोरणात्मक निर्णय न घेतल्यामुळे विद्यापीठाचा हेतू साध्य होत नव्हता. सोबतच विद्यार्थ्यांच्या विकासात आडकाठी येत होती. मात्र, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गेल्या दहा वर्षांपासून विविध गोष्टी मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला. प्रसंगी संघर्ष केला, आंदोलने केली, निवेदने दिली. या माध्यमातून विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक निर्णय हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने करवून घेतले. याचाच एक भाग म्हणून २०१८-१९पासून गोंडवाना विद्यापीठ येथील प्रत्येक महाविद्यालयात ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट सेल हे स्थापन करावे व विद्यार्थ्यांना नोकरीकरिता, व्यवसायाकरिता व त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता या सेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करावे, अशी मागणी केली होती. याचा पाठपुरावा विद्यार्थी परिषदेने वेळोवेळी केला. प्रसंगी आंदोलन, निवेदने, स्थानिक लोकप्रतिनिधी यांना निवेदन देऊन याचा पाठपुरावा केला. त्याच मागणीला धरून गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीने ३ जुलै २०२१ रोजी याबाबतचे परिपत्रक जाहीर केले व विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांना येणाऱ्या १५ दिवसांमध्ये ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट सेलबद्दलची संपूर्ण माहिती व अहवाल विद्यापीठाकडे पाठविण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती अभाविपचे चंद्रपूर जिल्हा संयोजक प्रवीण गिलबिले, गडचिरोली जिल्हा संयोजक अंकुश कुनघाडकर, ब्रह्मपुरी जिल्हा संयोजक प्रवीण गिरडकर यांनी दिली आहे.