आता एकाच अर्जातून मिळणार अनेक योजनांचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:28 AM2021-05-13T04:28:57+5:302021-05-13T04:28:57+5:30
अर्ज एक, योजना अनेक चिमूर : कोरोना महामारीतच शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाला सुरुवात होत आहे. याकरिता शासनाने महा-डीबीटी पोर्टलवर ...
अर्ज एक, योजना अनेक
चिमूर : कोरोना महामारीतच शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाला सुरुवात होत आहे. याकरिता शासनाने महा-डीबीटी पोर्टलवर "शेतकरी योजना" या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे" देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी शेती निगडित विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर "शेतकरी योजना" अंतर्गत “बियाणे" या घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आता एकच अर्ज करावा लागणार आहे.
या सुविधेअंतर्गत लाभार्थ्यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेतील सोया, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, आदी अनुदानावर बियाणे उपलब्ध होणार असून, १५ मे २०२१ पर्यंत शेतकऱ्याने अर्ज करणे बंधनकारक आहे. महा-डीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावरील “शेतकरी योजना” हा पर्याय निवडून शेतकरी स्वतःच्या मोबाईल, संगणक/लॅपटॉप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी) ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्रातील संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील. "वैयक्तिक लाभार्थी" म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल.
तसेच ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल, त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरित करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही. सदर कामासाठी आपण आपल्या जवळच्या सामूहिक सेवा केंद्राची मदत घेऊ शकता. तसेच यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास कृषी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन कृषी अधिकारी ज्ञानदेव तिखे यांनी केले आहे.