आता ॲपवरच मिळणार व्हीआयपी नंबर ! २५ पासून ऑनलाइन सेवेला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 03:32 PM2024-11-28T15:32:24+5:302024-11-28T15:33:59+5:30
Chandrapur : आरटीओतील गर्दी ओसरली; पसंतीच्या क्रमांकासाठी आता होणार नाही चक्कर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : तुम्हाला तुमच्या वाहनासाठी पसंतीचा क्रमांक हवा असेल, तर आरटीओ कार्यालयात जाण्याची, अर्ज करण्याची कटकट आता संपली आहे. परिवहन विभागाने पसंतीच्या क्रमांकासाठी सॉफ्टवेअर विकसित केले असून, ही सेवा राज्यभरातील आरटीओ कार्यालयांशी संलग्न करण्यात आली आहे. चंद्रपूर आरटीओ कार्यालयात सोमवार दि. २५ नोव्हेंबरपासून ही सुविधा सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आता घरबसल्या ऑनलाइन अर्ज व शुल्क भरून पसंतीचा क्रमांक मिळणार आहे.
आपल्या वाहनासाठी पसंतीचा क्रमांक मिळावा, यासाठी अनेकजण वाटेल ती किंमत मोजतात. त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) पायऱ्या झिजवतात. अशावेळी पसंतीचा क्रमांक मिळवून देण्याच्या बहाण्याने दलालांची साखळी वाहनमालकांची लूटही करते, परंतु परिवहन विभागाने स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित केले आहे. राज्यभरात ही सेवा कार्यन्वित करण्यात आली आहे. या माध्यमातून वाहनधारकांनी त्यांच्या वाहनासाठी पसंतीचा क्रमांक मिळावा, म्हणून घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
'व्हीआयपी' नंबरसाठी कायपण !
आजच्या तरुणाईमध्ये व्हीआयपी नंबरची मोठी क्रेझ दिसून येते. त्यासाठी ते लाखो रुपये मोजत असल्याचे दिसून येते.
दुचाकी अन् चारचाकीचा नंबर हवाय सेम-सेम !
अनेकांकडे दुचाकी व चारचाकी असेत. अशा चालकांना दोन्ही वाहनाला सेम- सेम नंबर हवा असतो. त्यासाठी ते प्रयत्न करत असतात.
याप्रकारच्या नंबर्ससाठी जास्त आटापिटा...
०१,०७, ००१, ११११, ५५५५, ०७८६, ७७७७ अशा प्रकारचे तर कुणी जन्मतारखेचे नंबर मिळविण्यासाठी आटापिटा करतात.
'व्हीआयपी' वाहनांची संख्या वाढली
आजच्या तरुणांना व्हीआयपी वाहन वापरण्याची मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. अनेकांकडे दोन ते पाच लाखांपर्यंत दुचाकी तर १० लाखांपासून ७० २ लाखांपर्यंत चारचाकी खरेदी केल्याचे दिसून येते.
असा करा ऑनलाइन अर्ज
१ पसंतीच्या क्रमांकासाठी https://fancy. parivahan.gov.in/ या संकेतस्थळावर नाव, आधार संलग्नित मोबाइल क्रमांक टाकून नाव नोंदणी करावी. त्यानंतर अर्ज आणि शुल्काचा भरणा करून पसंतीचा क्रमांक आरक्षित करता येतो.
२२ लाखाची एसयूव्ही; नंबरसाठी मोजले दीड लाख रुपये
वाहन खरेदीसाठी लाखो रुपये मोजल्यानंतर आवडीच्या नंबरसाठीही लाखो रुपये मोजावे लागत असल्याचे चित्र दिसून येते.
दलालांचा पत्ता कट होणार
पसंतीचा नंबर मिळवून देण्याच्या अनुषंगाने अनेक दलाल सक्रीय असतात. मात्र आता ऑनलाइन पद्धतीने काम होणार असल्याने दलालांचा पत्ता कट होणार आहे.
आरटीओ म्हणतात...
"फेसलेस सेवेमुळे आरटीओतील बहुतांश सेवेचा लाभ घरबसल्या घेता येतो. आता फॅन्सी नंबरसुद्धा ऑनलाइन पद्धतीने आरटीओ कार्यालयात न येता घरबसल्या आरक्षित करता येणार आहे. आरक्षित केलेला नंबर पूर्वी एकच महिना व्हॅलिड असायचा मात्र आता हा नंबर सहा महिने व्हॅलिड राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना अत्यंत सोईचे झाले आहे."
- किरण मोरे, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर.