न.प. कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 10:58 PM2019-01-01T22:58:35+5:302019-01-01T22:59:23+5:30
मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील नगर परिषद कर्मचाºयांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी काम बंद आंदोलनाचे शस्त्र उपसले. परिणामी, मंगळवारी दिवसभर नगर परिषद कार्यालयांमध्ये शुकाशुकाट दिसून आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील नगर परिषद कर्मचाºयांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी काम बंद आंदोलनाचे शस्त्र उपसले. परिणामी, मंगळवारी दिवसभर नगर परिषद कार्यालयांमध्ये शुकाशुकाट दिसून आला. विविध कामांसाठी कार्यालयात आलेल्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागले. आंदोलनादरम्यान, जिल्ह्यात कुठेही अनुचित घटना घडली नाही. दरम्यान, न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा नगर परिषद कर्मचारी संघटनांनी दिला आहे.
आंदोलनात २० कर्मचाऱ्यांचा सहभाग
सावली : नगर पंचायतच्या २० कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनात सहभाग घेतला. शासनाने नगर परिषद कर्मचाºयांना दिलेल्या आश्वासनांची पुर्ती केली नाही. त्यामुळे आंदोलनाचे पाऊल उचलावे लागले, अशी माहिती संघटनेने दिली. प्रलंबित मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी डॉ. माधुरी सलामे यांना देण्यात आले. बेमुदत आंदोलनात इंद्रजित गेडाम, मेघराज गावतुरे, अविनाश राऊत, संजय मेरूगवार, रविंद्र लाटेलवार व अन्य कर्मचारी सहभागी झाले आहेत. समस्यांची पुर्तता होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कर्मचाºयांनी व्यक्त केला.
प्रशासकीय कामकाज ठप्प
चिमूर : नगर परिषदमधील संवर्ग कर्मचारी, स्वच्छता कामगार, रोजंदारी कर्मचारी, अनुकंपधारक विविध विभागात काम करणाºया ७७ कर्मचाºयांनी काम बंद आंदोलनात सहभाग घेतला. नगर परिषद कर्मचारी संघाच्या वतीने मुख्याधिकारी मनोजकुमार शहा यांना १५ डिसेंबरला निवेदन देण्यात आले होते. दरम्यान, महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटना संघर्ष समितीच्या निर्णयानुसार चिमूर नगर परिषदमधील कर्मचाºयांनी १५ डिसेंबरला धरणे आंदोलन केले होते. २९ ते ३१ डिसेंबरपर्यंत सर्व कर्मचाºयांनी काळ्या फिती लावून काम केले. परंतु मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने १ जानेवारी २०१९ पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनात नगर परिषद संघाचे अध्यक्ष मीनाज शेख, उपाध्यक्ष हरिचंद्र डांगे, सचिव शंकर पचारे, कोषाध्यक्ष हेमंत राहुलवार,घनश्याम उईके, प्रवीण कारेकार, शुभम गौरकार, शरद पाटील, प्रदीप वासनिक सहभागी झाले आहेत. कर्मचाºयांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारल्यामूळे शहरातील अत्यावश्यक नागरी सेवांवर अनिष्ट परिणाम झाला आहे.
ब्रह्मपुरीतही आंदोलन
ब्रह्मपुरी : १० मार्च १९९३ नंतर न. प. मध्ये रोजंदारींवर कार्य करणाºया कर्मचाºयांना स्थायी करावे, सातवा वेतन आयोगा लागू करावा, अनुकंपाधारकांना सेवेत घ्यावे, सफाई कामगारांची पदभरती करावी, न. प. मधील अतिरिक्त कर्मचाºयांना कायम सेवेत घेणे आदींसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी ब्रह्मपुरीतही बेमुदत संप सुरू आहे.
स्वच्छतेची कामे प्रभावित
नागभीड : येथील न.प. कर्मचाऱ्यांनी न. प. कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. आज सकाळपासूनच कर्मचाºयांनी प्रशासकीय कामांवर बहिष्कार टाकल्याचे दिसून आले. आंदोलनाची माहिती नसलेल्या नागरिकांना नगर परिषद कार्यालयात येऊन परत जावे लागले. आंदोलनाचा शहरातील दैनंदिन स्वच्छता व प्रशासकीय कामांचा खोळबा झाला आहे. कामबंद आंदोलनात जिल्हा सचिव मोरेश्वर येरणे, अध्यक्ष परसराम वंजारी, सचिव रितेश येरणे, नंदा गोडे, मीनाक्षी खापर्डे, गजानन समर्थ, गुलाब ठाकरे, उमाकांत बोरकर, विनायक चौधरी, बाळकृष्ण राऊत व अन्य कर्मचारी सहभागी झाले आहेत.