सीमेवरील गावांत दारू दुकानांची संख्या वाढली
By Admin | Published: July 18, 2014 12:00 AM2014-07-18T00:00:44+5:302014-07-18T00:00:44+5:30
तालुक्यातील वैनगंगा तिरावर वसलेल्या तारसा (खुर्द व बुज) या ग्रामपंचायत हद्दीतील अल्प लोकसंख्या असलेल्या गावात दिवसेंदिवस दाुरु दुकानांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शेजारील दारूबंदी
गोंडपिपरी : तालुक्यातील वैनगंगा तिरावर वसलेल्या तारसा (खुर्द व बुज) या ग्रामपंचायत हद्दीतील अल्प लोकसंख्या असलेल्या गावात दिवसेंदिवस दाुरु दुकानांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शेजारील दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारू तस्करी होण्याची शक्यता आहे. शासनाने तारसा गावाच्या लोकसंख्येचा विचार न करता मोठ्या अर्थकारणातून धनाढ्यांना परवाने वितरीत केले असून त्यामुळे परिसरातील महिला व नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.
तालुका सिमेवरुन वाहणारी वैनगंगा नदीही चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही जिल्ह्याच्या सिमेवरुन वाहते. चंद्रपूर जिल्हा सिमेवर वसलेल्या तारसा (खुर्द) या गावाची अंदाजे लोकसंख्या तेराशेच्या घरात आहे. मात्र वैनगंगा तिरावरील तारसा गावाला गेल्या काही वर्षांपूर्वी मद्यसम्राटांनी दारू व्यवसायाचे केंद्र बनवित चार बिअर बार व एक देशी दारू दुकान उघडले आहे. तारसा या गावातील लोकांची आर्थिक परिस्थिती व व्यसनाधिनतेचे प्रमाण अल्प असतानाही दिवसेंदिवस या गावात दारू दुकानांच्या संख्येतील वृद्धीमुळे आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
तारसा या गावात शासनाकडून मद्य प्रतिष्ठानांना देण्यात आलेल्या परवान्यांमुळे शेजारील दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारू तस्करी करणाऱ्याचे प्रमाणही वाढले आहे.
अनेकदा पोलिसांनी वाहन तपासणी दरम्यान दारू पकडून कारवाई केली आहे. परिसरातील नागरिकांच्या मते मुबलक पाणी साठ्याचे पात्र असलेल्या वैनगंगा नदी तिरावर शासनाने बेरोजगारांसाठी मोठा प्रकल्प उभारुन रोजगाराची संधी उपलब्ध करावी, अशी अपेक्षा असताना शासन मात्र जिल्हा सिमेवरील अविकसित व अल्प लोकसंख्या असलेल्या गावात क्षमतेपेक्षा अधिक दारू दुकानांचे परवाने वितरीत करुन सामाजिक आरोग्याला धोका निर्माण करीत असल्याचा आरोप होत आहे. परवाना वाटपाच्या मोठ्या अर्थकारणातून धनदाडग्यांना व्यवसायासाठी रान मोकळे करुन देत असल्याचा आरोपही परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
गेल्या चार ते पाच वर्षांत येथून दारू तस्करीच्या वाढत्या प्रमाणामुळे पोलिसांनाही तारेवरची कसरत करावी लागत असून पोलिसांना गुंगारा देण्यात पटाईत ठरलेल्या काही दारु तस्करांनी लाखोंची माया जमवून ‘सेटींग’ प्रणालीतून दारू तस्करीचा व्यवसायही विस्तारला आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन मद्यांच्या दुकानांना परवानगी देऊ नये, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)