जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या 20 वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 05:00 AM2021-05-15T05:00:00+5:302021-05-15T05:00:37+5:30
म्युकरमायकोसिस हा आजार कर्करोगापेक्षा १० टक्क्याहून अधिक वेगाने शरीरात पसरतो. यामुळे मोठी शारीरिक हानी होते. याकडे दुर्लक्ष केल्यास कित्येक जणांना त्याचा जबडा, डोळे आणि जीवही गमावावा लागू शकतो. सीटी स्कॅन, इंडोस्कोपी व बायोप्सीच्या साह्याने या आजाराचे निदान लवकर करू शकतो. कोरोना रुग्णांना या आजारापासून वाचविण्यासाठी दक्ष राहणे आवश्यक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना पाठोपाठ आता म्युकरमायकोसिस या गंभीर आजाराने डोके वर काढल्याने आरोग्यविषयक चिंतेत आणखी भर घातली आहे. जिल्ह्यात या आजाराच्या रुग्णांची संख्या आता २० वर गेली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. निवृत्ती राठोड यांनी दिली.
म्युकरमायकोसिस हा आजार कर्करोगापेक्षा १० टक्क्याहून अधिक वेगाने शरीरात पसरतो. यामुळे मोठी शारीरिक हानी होते. याकडे दुर्लक्ष केल्यास कित्येक जणांना त्याचा जबडा, डोळे आणि जीवही गमावावा लागू शकतो. सीटी स्कॅन, इंडोस्कोपी व बायोप्सीच्या साह्याने या आजाराचे निदान लवकर करू शकतो. कोरोना रुग्णांना या आजारापासून वाचविण्यासाठी दक्ष राहणे आवश्यक आहे. त्यासाठी फिजिशियन, दंतचिकित्सक, ओरल सर्जन, नाक कान घसा तज्ज्ञ, न्यूरो सर्जन यांच्याकडून तपासणी करून घेण्याचे आवाहनही डाॅ. राठोड यांनी केले आहे.
या आजारावर निदान करून बुरशी प्रतिकारक उपचार पद्धती अवलंब करणे आवश्यक आहे. याकरिता ॲन्टिफंगल थेरपी तसेच शरीराच्या इतर भागाग संसर्ग पोहचला असल्यास शस्त्रक्रीया करण्याची गरज पडते, असेही डाॅ.राठोड यांनी सांगितले.
या आजाराची लक्षणे
चेहऱ्यावर सूज येणे, दात दुखणे, दात हलणे, हिरड्यातून पस येणे, जबड्याचे हाड उघडे पडणे, ताेंडातून घाणेरडा वास येणे, नाकातून रक्त येणे, डोळ्यावर सूज येणे, डोळ्यांची हालचाल कमी होणे, चेहऱ्यावर सूज आलेल्या जागी त्वचा काळी पडणे, नाकात अडथळे निर्माण होणे, नाकात काळे सुके स्क्रस्ट तयार होणे.
म्युकरमायकोसिस म्हणजे काय?
हा दुर्मिळ आजार असला तरी नवा नाही. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या, अतिदक्षता विभागात असलेल्या तसेच अवयव प्रत्यारोपण केल्या जाणाऱ्या रुग्णांना ब्लॅक फंगस म्हणजे म्युकरमायकोसिसचा धोका असतो. कोविड १९ मुळे त्याची लागण होत असल्याची बाब नवी व धोकादायक आहे. हा बुरशीजन्य आजार आहे. या बुरशीचे कण श्वासाद्वारे शरीरात गेल्यावर फुफ्फुस तसेच सायनस याच्यावर दुष्परिणाम करतो. याची लागण एकापासून दुसऱ्याला होत नाही.
कोविड १९ आणि म्युकरमायकोसिस
मधुमेह, फार जास्त दिवस रुग्णालयामध्ये ॲडमिट राहणारे, रोगप्रतिकारक क्षमता कमी करणारी औषधी यामध्ये कोविड -१९ चा उपचार घेत असलेल्या रुग्णांना बरे होण्यासाठी स्टेराईड आणि काही औषधे देण्यात येतात. यामुळे त्याच्या प्रतिकारशक्तीवर बिकट परिणाम होतो. यामध्ये म्युकरमायकोसिसचा धोका वाढतो. त्यामुळे वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.
उपचारासाठी आवश्यक उपकरणे त्वरित उपलब्ध करावी : सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर जिल्ह्यात आजघडीला म्युकरमायकोसिसचे २० रुग्ण आढळल्याची नोंद आहे. या आजारावरील उपचारासाठी आवश्यक उपकरणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे तातडीने उपलब्ध करण्याची मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे केली आहे. या आजारावरील उपचारासाठी एमआरआय, सिटी विथ कॉन्ट्रास्ट, नेझल एन्डोस्कोप ही उपकरणे आवश्यक असून गोरगरीब रूग्णांना या आजारासंदर्भातील उपचार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय चंद्रपूर येथे घेणे सोईचे व्हावे, यादृष्टीने या उपकरणांची खरेदी तातडीने करण्याची आवश्यकता आहे. या उपकरणांसह सदर आजारावरील उपचारासाठी एमडी मेडीसीन तसेच नेफ्रोलॉजिस्ट तज्ज्ञांची पदे मंजूर करून ही पदे भरण्याची आवश्यकता आहे. त्या माध्यमातून या रूग्णालयात म्युकरमायकोसिस या आजारावर उपचार घेणे रूग्णांना सोईचे ठरेल, याकडे आ. मुनगंटीवार यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख व वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांचे पाठविलेल्या पत्रातून लक्ष वेधले आहे.
तिसऱ्या लाटेसाठी सज्ज व्हा
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता टास्क फोर्ससह अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका संभावण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. या संभाव्य संकटावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे पेड्रीयाटिक व्हेंटिलेटर व न्युओनेटल तसेच सीपीएपी मशीन ही उपकरणेसुध्दा अत्यावश्यक आहेत. या उपकरणांच्या माध्यमातून बालरुग्णांवर प्रभावी उपचार करता येणार असल्याने ही उपकरणे सुध्दा तातडीने या रूग्णालयासाठी उपलब्ध करावी असे आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या प्रशासनाने याबाबतचे प्रस्ताव शासनाकडे त्वरीत सादर करावे, अशा सूचना आ. मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत.