माॅर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:36 AM2021-02-25T04:36:16+5:302021-02-25T04:36:16+5:30
चंद्रपूर : मागील वर्षभरापासून कोरोनाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनाची अनेकांना लागणही झाली असून, यामध्ये जिल्ह्यातील ३००च्या वर बळी ...
चंद्रपूर : मागील वर्षभरापासून कोरोनाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनाची अनेकांना लागणही झाली असून, यामध्ये जिल्ह्यातील ३००च्या वर बळी गेले आहे. त्यामुळे नागरिक आरोग्याबाबत आता दक्ष होत असून, पहाटे फिरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढली आहे. भल्या पहाटे शहरातील रस्ते माणसांनी फुलून गेल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
कोरोना काळ, त्यातच धावपळीच्या जीवनात आरोग्य तंदुरुस्त राहावे, यासाठी पहाटे उठून रस्त्यावरून चालण्यासारखा सोपा आणि सहजपणे होणारा दुसरा कोणताही व्यायाम नाही. त्यामुळे रक्ताभिसरण उत्तमप्रकारे होऊन दिवसभर काम करण्यासाठी पुरेशी ऊर्जा मिळते. थकवा जाऊन काम करण्याचा उत्साह वाढतो. वाढता ताण कमी करण्यासाठी व विविध प्रकारच्या आजारांवर रामबाण उपाय ठरणाऱ्या माॅर्निंग वॉकसाठी दिवसेंदिवस रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे.
हिवाळा संपत असून, आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. दिवसभर उकाडा आणि पहाटेच्या सुमारास थंडी जाणवत आहे. या थंडीत फिरण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. त्यातही जे आपल्या प्रकृतीबाबत जागरूक आहेत, ते नागरिक पहाटे फिरतातच.
सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकालाच काही ना काही व्याधी जडलेल्या आहेत. कामाचा ताण व वेळेचा अभाव, यामुळे ब्लडप्रेशर, मधुमेह यांसारख्या अनेक व्याधी अनेकांना कॉमन झाल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी दवाखान्यात खेटे घालावे लागल्याने रुग्णांच्या खिशाला झळ पोहोचते. त्यापोटी होणारे आर्थिक नुकसान टाळले जावे, तसेच धकाधकीच्या जीवनात निदान चार क्षण तरी आपल्याला स्वत:साठी जगता यावे, म्हणून नागरिक मार्निंग वॉकला पसंती देत आहेत.
शहराच्या सर्वच मार्गाने रस्ते, उद्याने, मोकळ्या जागा नागरिकांच्या गर्दीने फुलून जात आहेत. चालणे, धावणे, योगासन, प्राणायाम, सायकलिंग, सूर्यनमस्कार केले जात आहे. तरुण पिढी आरोग्याच्या बाबतीत जागरूक असल्याने पहाटे फिरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.