सावली तालुक्यात वाघ-बिबट्यांचे प्रस्थ वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:26 AM2021-07-26T04:26:19+5:302021-07-26T04:26:19+5:30
सावली : सावली तालुक्यात वाघ आणि बिबट्यांचे प्रस्थ वाढले आहे. गेल्या दहा-बारा दिवसांतील हल्ल्यांच्या घटनेवरून हे निदर्शनात येते. या ...
सावली : सावली तालुक्यात वाघ आणि बिबट्यांचे प्रस्थ वाढले आहे. गेल्या दहा-बारा दिवसांतील हल्ल्यांच्या घटनेवरून हे निदर्शनात येते. या प्रकारामुळे तालुक्यातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. त्यामुळे वनविभागाने सजग राहण्याची आवश्यकता आहे.
व्याहाड बूज परिसरातील तीन व्यक्तींवर बिबट्याने हल्ला केला. त्यात एक महिला मरण पावली. दोन जण जखमी आहेत. या घटनेला दहा-बारा दिवस उलटत नाहीत तर सावली वनपरिक्षेत्रातीलच टेकाडी येथे वाघाने गुराख्याला ठार केल्याची घटना घडली. यापूर्वीही तालुक्यातील गावांमध्ये अशा घटना वारंवार घडल्या आहेत. गेवरा परिसरात वाघाचे दर्शन नित्याचीच बाब झाली आहे. बिबटे तर आता घरातच शिरून हल्ला करत आहेत. ही वनविभागासाठी धोक्याची घंटा आहे. यावर्षी तालुक्यात मोठ्या प्रमाणात व्याघ्र दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास एक बिबट्या घोडेवाही रस्त्यावर सावली शहरानजीक असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
बॉक्स
नरभक्षी बिबट्याची वन विभागाला हुलकावणी
व्याहाड बूज, सामदा, वाघोली बुटी या गावातील सीमांवर हल्ला करणारा बिबट्या एकच असून तो नरभक्षी झाल्याचे बोलले जात आहे. रोजच तो गावात येऊन कोंबड्या, शेळ्यांवर ताव मारत असल्याचे सांगितले जात आहे. त्याला जेरबंद करण्यासाठी जंगल परिसरात आठ पिंजरे लावण्यात आले आहेत. मात्र, वन विभागाला बिबट्या हुलकावणी देत आहे. दहा-बारा दिवसांपासून वन विभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहे. मात्र, बिबट्याला जेरबंद करण्यात अपयश येत आहे. असेच होत राहिले तर नरभक्षी झालेला बिबट्या परिसरात धुमाकूळ माजविल्याशिवाय राहणार नाही, ही भीती ग्रामस्थांना निर्माण झाली आहे.