रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकेचाच उपचाराअभावी मृत्यू, चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 01:22 PM2023-08-19T13:22:48+5:302023-08-19T13:24:13+5:30
परिचारिका संघटना आक्रमक
चंद्रपूर : रुग्णांची सेवा शुश्रूषा करून त्यांना लवकर बरे करण्याची मुख्य भूमिका बजावणाऱ्याचा परिचारिकेचा चक्क उपचाराअभावी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उघडकीस आल्याने मोठी खळबळ माजली आहे. इतरांना सेवा देणाऱ्या परिचारिकांनाच वेळेवर उपचार मिळत नसेल तर इतरांचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेचा निषेध करत परिचारिका संघटनांनी कामबंद आंदोलन केले. सीमा मेश्राम (२९) असे मृत परिचारिकेचे नाव आहे.
सीमा मेश्राम या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात परिचारिका होत्या. १६ ऑगस्ट रोजी प्रसूती वॉर्डामध्ये रात्रपाळीत त्या कर्तव्यावर होत्या. दरम्यान, त्यांना भोवळ आली. त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. मात्र, त्यावेळी तेथे एकही डॉक्टर कर्तव्यावर नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजेपर्यंतही सीमाला उपचारच मिळाला नाही. प्रकृती गंभीर होत असल्याचे पाहून कुटुंबीयांनी खासगी डॉक्टरांकडे नेले. नंतर शुक्रवारी तातडीने नागपूरला नेले. परंतु, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतापलेल्या परिचारिकांनी कामबंद आंदोलन केले.
आरएमओ, डीनचा प्रतिसादच नाही
या घटनेबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता मिलिंद फुलपाटील, वैद्यकीय अधीक्षक निवृत्ती जीवने यांना ‘लोकमत’ने संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न केला. त्यांना तसा संदेशही पाठवला. मात्र, त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही.
मृत्यू प्रकरणाची चौकशी करा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सोयी सुविधांकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष नाही, पालकमंत्री आढावा घेत नाहीत. वैद्यकीय अधिकारी कोणालाच जुमानत नाही, अशी स्थिती निर्माण झाल्याने सामान्य माणसांच्या आरोग्याचे हाल होत आहेत, असा आरोप करत रात्रपाळीत वैद्यकीय अधिकारी का उपलब्ध नव्हते, तज्ज्ञ डॉक्टर कुठे गेले होते, रात्रभर मृत्यूशी झुंज देणाऱ्या परिचारिकेची का तपासणी झाली नाही, या घटनेची आरोग्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणी चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केली आहे.