ओबीसी आंदोलनकर्ते रवींद्र टाेंगेंना रुग्णालयात हलविले, विजय बलकीने सुरू केला अन्नत्याग
By राजेश मडावी | Published: September 22, 2023 05:40 PM2023-09-22T17:40:06+5:302023-09-22T17:41:08+5:30
ओबीसी आंदोलन चिघळणार : ३० सप्टेंबरला ‘चंद्रपूर जिल्हा बंद’चे आवाहन
चंद्रपूर : जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर ११ सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलन करणारे राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांची प्रकृती खालावल्याने प्रशासनाने शुक्रवारी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले तर त्यांच्या जागी विजय बलकी यांनी १२ व्या दिवसापासून उपोषण सुरू केले. दरम्यान, राज्य सरकारने अजुनही आंदोलनाची दखल न घेतल्याने ओबीसी संघटनांनी आज मातोश्री सभागृहात बैठक घेऊन लढा तीव्र करण्याचा निर्णय घेतला आणि ३० सप्टेंबरला ‘चंद्रपूर जिल्हा बंद’चे आवाहन केले.
राज्य शासनाने मराठा समाजाला कुणबी जातीचे जातीचे प्रमाणपत्र देऊ नये, यासह अन्य मागण्यांसाठी रवींद्र टोंगे अन्नत्याग आंदोलन करीत आहेत. त्यांची प्रकृती खालावल्याने प्रशासनाने आज रुग्णालयात दाखल केले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आंदोलनाची दखल घेतली नाही, असा आरोप करून पुढची दिशा ठरविण्यासाठी आज दुपारी १२ वाजता तुकूम मातोश्री विद्यालयात ओबीसींच्या विविध संघटनांनी सभा घेतली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर यांनी आंदोलनाचा पुढील कार्यक्रम जाहीर केला.
बैठकीत ॲड. पुरुषोत्तम सातपुते, दिनेश चोखारे, माजी नगरसेवक नंदू नागरकर, ॲड. दत्ता हजारे, हिराचंद्र बोरकुटे, गजानन गावंडे, अनिल धानोरकर, अनिल डहाके, रविंद्र शिंदे, निलेश बेलखेडे, राजेश बेले, शाम राजूरकर, शाम लेडे, रामराव हरडे, प्रदीप देशमुख, अक्षय येरगुडे, भूषण भुसे, संजय कन्नावार, विलास माथनकर, सतीश मालेकर, सुधाकर काकडे, उमाकांत धांडे, प्रेमा जोगी, रणजित डवरे, ॲड. सोनुने, विजय मुसळे, मनीषा बोबडे, कुसुम उदार, किरण देरकर,गोमती पाचभाई उपस्थित होते.
असे आहे ओबीसी आंदोलनाचे पुढील टप्पे...
शनिवारी (दि.२३) जनता कॉलेज चौक, नागपूर मार्गावर चक्का जाम आंदोलन होईल. रविवारी (दि. २४) मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व बहुजन कल्याण मंत्री यांची तिरडी काढून केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवर यांच्या निवासस्थानावर धडकणार आहे. २५ सप्टेंबरला सर्व तालुकास्थळी आंदोलन व ३० सप्टेंबरला चंद्रपूर जिल्हा बंद करण्याचा निर्णय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बबनराव फंड यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ओबीसी संघटनांनी घेतला.