चंद्रपूरात ओबीसी परिषद होणार; शेकडो जातींचे प्रतिनिधी करणार मंथन
By राजेश भोजेकर | Published: December 13, 2023 02:46 PM2023-12-13T14:46:48+5:302023-12-13T14:47:28+5:30
डॉ. अशोक जीवतोडे : मराठ्यांना आरक्षण द्या पण, ओबीसींना धक्का नको
चंद्रपूर : ओबीसीमध्ये अनेक जाती आहेत. मात्र या जातींकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. या सर्व जातींना एकत्र करून चंद्रपूरात येत्या १७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जनता महाविद्यालयाच्या पटांगणावर ओबीसी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या परिषदेत ओबीसीमध्ये समाविष्ट असलेल्या शेकडो जातीतील प्रतिनिधी सहभागी होऊन ओबीसींच्या मुद्द्यांवर आणि न्याय्य मागण्यांवर विचार मंथन करणार आहे. परिषदेत पारीत झालेला ठराव राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे, अशी विदर्भवादी ओबीसी नेते डाॅ. अशोक जिवतोडे यांनी दिली.
सध्या राज्यात मराठा आरक्षण या विषयावर जे वातावरण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजात खदखद आहे. देशाच्या स्वातंत्र्यापासून आजतागायत ओबीसी समाजाचे घटनादत्त अधिकार व हक्क प्रलंबित आहेत. ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात ओबीसी समाज व संघटना सातत्यपूर्ण लढा देत आला आहे. सध्याचे राज्यातील वातावरण बघता ओबीसी समाजाला डिवचण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येते. या सर्वकष बाबींवर ओबीसीमधील जातसमूहाचे प्रतिनिधी विचारमंथन करणार आहे, ओबीसीतील शेकडो जात संघटनांची वज्रमूठ या निमित्ताने बांधली जाणार आहे, अशी माहितीही विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. जीवतोडे यांनी दिली.
मनाेज जरांगेंच्या भूमिकेबद्दल ओबीसींमध्ये संभ्रम
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांची आरक्षणाबाबतची भूमिका वारंवार बदलताना दिसून येत आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या व ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्या, ही त्यांची मागणी ओबीसी समाजाला न पटणारी आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून तर आजतागायत मराठा समाजाला राज्यात मिळालेल्या प्रतिनिधित्वानंतरही आत्मचिंतन करण्याचे सोडून समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचे कार्य ते करीत आहेत. जो ओबीसी समाज नेहमी मराठा समाजासोबत राहिला आहे. त्याच ओबीसी समाजाच्या पाठीत खंजर खुपसण्याचा प्रयत्न जरांगे यांचा दिसतो आहे, अशी टीकाही यावेळी डाॅ. जिवतोडे यांनी केली. ओबीसी समाजातील समस्त जातसमुदायाची ताकद व एकता दाखविण्यासाठीच 'ओबीसी बचाव परीषद' आयोजित करण्यात आलेली आहे, असा पुनरुच्चार डाॅ. जिवतोडे यांनी केला.