ओबीसी महासंघाचं २१ दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण मागे, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं 'हे' आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 10:44 AM2023-09-30T10:44:40+5:302023-09-30T10:47:22+5:30
उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पाणी पिऊन उपोषणकर्त्यांनी हे उपोषण मागे घेतले
चंद्रपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून 'आरक्षण'वाद सुरू आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण आबाधित ठेवण्याच्या मागणीसाठी चंद्रपुरात ओबीसी महासंघाकडून गेल्या २१ दिवसांपासून आंदोलन सुरू होते. चंद्रपुरात राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत चंद्रपुरातील ओबीसी आंदोलक रवींद्र टोंगे यांनी उपोषण सोडले.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. मराठा-ओबीसी वाद होणार नाही, याची काळजी घेणार असल्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. सरकार ओबीसी समाजाच्या पाठीशी असून ओबीसी समाजाला दिलेली आश्वासनं पूर्ण करणार असल्याचंही ते म्हणाले. तसेच, ओबीसींसाठी सुरू असलेल्या विविध योजनांसाठी सरकारकडून भरीव आर्थिक मदत केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करू नये, बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जनगणना करावी. राज्यभरात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करावे, यासह अन्य २२ मागण्यांना घेऊन ११ सप्टेंबरपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले होते. चंद्रपुरात राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. २२ सप्टेंबर रोजी टोंगे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या जागेवर विजय बल्की व प्रेमानंद जोगी हे अन्नत्याग आंदोलनात सहभागी झाले होते. यानंतर आंदोलन तीव्र करण्यात आले. दरम्यान ओबीसी आंदोलनाचा वाढता दबाव पाहून सरकारने मुंबई येथे २९ सप्टेंबरला आंदोलक ओबीसी संघटनांची बैठक बोलावली. या बैठकीकडे ओसीबी बांधवांचे लक्ष लागले होते.