जिल्ह्याला २६५ बायोगॅस संयंत्राचे उद्दिष्ट
By Admin | Published: October 7, 2016 01:03 AM2016-10-07T01:03:59+5:302016-10-07T01:03:59+5:30
राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन प्रकल्प कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्ह्याला २६५ बायोगॅस संयंत्र उभारणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
राजकुमार चुनारकर चिमूर
राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन प्रकल्प कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्ह्याला २६५ बायोगॅस संयंत्र उभारणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सन २०१६-१७ या वर्षात हे उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी जिल्ह्यातील पंधराही पंचायत समिती व कृषी विभाग कामाला लागले आहेत.
कृषी प्रधान देश म्हणून ओळख असलेल्या व आर्थिक व्यवस्था शेतीवर अवलंबून असल्याने देशाचा विकास नद्या, नाले, दऱ्याखोरे आणि जंगल या साधन संपत्तीवर अवलंबून आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झाले आहे. त्यामुळे वनसंपदा नष्ट होत आहे. जी वनसंपदा आहे ती नष्ट होऊ नये, या संपत्तीचे संवर्धन व वापर नियोजनपूर्वक झाले पाहिजे. तसेच जंगलतोड थांबण्यासाठी जनतेला पर्यायी ऊर्जास्रोत म्हणून बायोगॅस संयंत्र उभारणीवर अधिक भर देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राष्ट्रीय बायोगॅस विकास प्रकल्पांतर्गत ही कामे केली जाणार आहे.
राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम ही योजना १०० टक्के केंद्र पुरस्कृत आहे. केंद्र शासनाकडून प्रतिवर्ष निर्गमित केल्या जाणाऱ्या प्रशासकीय मंजुरी आदेशातील मार्गदर्शक सूचनानुसार बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील सर्व लाभार्थ्यांना अनुदान मिळते.
सर्वसाधारण लाभार्थ्यास दोन ते सहा घनमीटर संयत्रास ९ हजार रुपये, अनुसूचित जाती, जमातीच्या लाभार्थ्यास दोन ते सहा घनमीटर संयत्रास ११ हजार रुपये अनुदान मिळते. विशेष म्हणजे, शौचालय जोडलेल्या बायोगॅस संयत्रास अतिरिक्त केंद्रीय सहाय्य म्हणून बाराशे रुपये मिळतात. या योजनेमध्ये बॉयोगॅस पुरविणे, एलपीजी व इतर पारंपारिक ऊर्जा साधनांचा वापर कमी करणे, रासायनिक खताचा वापर कमी करुन सेंद्रीय खताचा वापर करण्यास लाभार्थ्यांना प्रवृत्त करणे, ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारणे व त्यांना होणारा त्रास कमी करणे.
बायोगॅस संयत्रास शौचालय जोडून ग्रामीण भागातील स्वच्छता राखण्यास मदत होते. तसेच या सेंद्रीय खतामुळे जमिनीची पोत सुधारत असल्याने शेतकऱ्यांसाठी ही योजना फायद्याची ठरणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.
गोबरगॅस काळाची गरज
गोबर गॅस स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस मिळण्याचे सर्वात स्वस्त साधन आहे. गावखेड्यात स्वयंपाकासाठी आजही इंधन म्हणून लाकूड, गोवऱ्या, पिकाचे अवशेष (तुराट्या) याचा वापर केला जातो. या पारंपारिक इंधनाच्या वापरासही मर्यादा असून सदर इंधन हे सहज उपलब्ध होणे कठीण झालेले आहे. या इंधनाचा वापर आरोग्यास हानिकारक आहे. पिकाच्या अवशेषाचा इंधन म्हणून वापर करणेही योग्य नाही. आधीच रासायनिक खतामुळे जमिनीची सुपिकता कमी होत आहे. यामुळे गोबर गॅस आजची गरज बनली आहे.