बाबुजींच्या जयंतीनिमित्त सोमवारी महारक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 11:36 PM2018-06-29T23:36:11+5:302018-06-29T23:36:59+5:30
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक- संपादक श्रद्धेय जवाहलाल दर्डा उपाख्य बाबूजींच्या जयंतीनिमित्त सोमवार दि. २ जुलैै रोजी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक- संपादक श्रद्धेय जवाहलाल दर्डा उपाख्य बाबूजींच्या जयंतीनिमित्त सोमवार दि. २ जुलैै रोजी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. हेडगेवार रक्तपेढी व लोकमत जिल्हा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रामाळा तलाव मार्गावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय सभागृहात सकाळी १० वाजता या शिबिराला सुरूवात होणार आहे. या उपक्रमात शहरातील अनेक सामाजिक आणि शैक्षणिक संस्थाही सहभागी होणार आहेत.
रक्तदान म्हणजेच जीवनदान. रक्तदान केल्याने माणूस अशक्त होत नाही तर माणुसकी सशक्त होते. शिबिराला वेळेवरही उपस्थित राहून रक्तदान करता येणार आहे. नाव नोंदणी करण्याची गरज नाही. डॉ. बी. सी. रॉय यांच्या स्मृतीनिमित्त देशभरात १ जुलै हा ‘डॉक्टर डे’ म्हणून पाळला जातो. तर, १ जुलै ते ७ जुलै हा ‘डॉक्टर्स वीक’ म्हणून पाळला जातो. बाबुजींच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या सहकार्यातून हा रक्तदान शिबिराचा उपक्रम सामाजिक उपक्रम व्हावा, यासाठी आयएमएचे पदाधिकारी आणि सामाजिक संस्था या महारक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी सरसावल्या आहेत. या शिबिरामध्ये रक्तदान करून सामाजिक उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन लोकमत जिल्हा कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. माहितीसाठी अमोल कडुकर (९२७०१३१५८०), सोनम मडावी (९९७५६६६३५५) संपर्क साधावा.
लोकमत सखी मंच, युवा नेक्स्ट सदस्यांना आवाहन
बाबुजींच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या सामाजिक उपक्रमात लोकमत सखी मंच, लोकमत युवा नेक्स्टचे सर्व सदस्य, वृत्तपत्र विक्रेतेबंधूंसह महाविद्यालयीन युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
रक्तदात्यांना प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू
डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या सहकार्याने होणाऱ्या या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या नागरिकांना ब्लड डोनर कार्ड दिले जाणार आहे. यासोबतच प्रमाणपत्र देऊ गौरवित केले जाणार आहे. तसेच रक्तदात्यांना प्रथमोपचार किट दिली जाणार आहे.