व्यावसायिक चिंतेत : पिरलीतील मध जाते राज्यभर
By admin | Published: July 14, 2014 01:52 AM2014-07-14T01:52:23+5:302014-07-14T01:52:23+5:30
नदी, नाले, झुडुपी जंगल असे निसर्गाचे वरदान लाभलेले
मधपेट्याच्या नुकसानीची झळ कायमच
भद्रावती : नदी, नाले, झुडुपी जंगल असे निसर्गाचे वरदान लाभलेले भद्रावती तालुक्यातील पिरली हे गाव मधमाशांच्या वसाहती मिळण्याचे विदर्भातील प्रमुख ठिकाण बनले आहे. १५ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या मधमाशा पालन व्यवसायाचे स्वरूप आता मोठ्या प्रमाणात वाढले आहे. येथील मध विदर्भातच नव्हे तर राज्यातही पोहचले आहे. परंतु मागील वर्षी मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात येथील ११ मधपाळांच्या ८३ मधपेट्या वाहून गेल्या. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. शासनाकडून त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. याची झळ मात्र या व्यवसायाला पोहचली आहे. त्यातून आजही येथील मधपाळ सावरले नसल्याचे चित्र आहे.
१५ वर्षांपूर्वी येथील संजय कोलते व गोवर्धन शेंडे या युवकांनी कुठलेही प्रशिक्षण नसताना फक्त इच्छाशक्तीच्या आधारे मधमाशी पालन व्यवसायाला पिरली येथे सुरूवात केली. निसर्गातील मधमाशा शोधून व झाडाच्या पोकळीतून काढून त्या मधमाशा पेटीत टाकण्याचा सपाटा त्या युवकांनी सुरू केला. प्रशिक्षणाअभावी मधमाशा सुरूवातीला पेटीत राहत नव्हत्या. प्रशिक्षणाच्या शोधात त्यांची मधुकर भलमे व प्रा. तात्यासाहेब धानोरकर यांची भेट झाली. त्यानंतर पिरली येथील सात युवकांनी शेगावला दररोज सायकलने ये-जा करून १५ दिवसांचे प्रशिक्षण घेतले आणि पिरली येथे शास्त्रशुद्ध पध्दतीने मधमाशी पालन व्यवसायास सुरूवात झाली. खादी ग्रामोद्योग चंद्रपूर व जिल्हा नियोजन समितीच्या विद्यमाने याठिकाणी निवासी मधपाळ प्रशिक्षण घेण्यात आले. एकट्या पिरली गावाचे ११ मधपाळ यात सहभागी झाले.
आज याठिकाणी मधमाशा पालन या व्यवसायाकडे शेतकऱ्यांना शेतीला उत्तम जोडधंदा म्हणून पाहिले जात आहे. या व्यवसायाला जास्त भागभांडवलाची आवश्यकता नाही. तसेच या व्यवसायामुळे परागकिरणाची क्रिया जलद होऊन शेतीच्या उत्पादनात जवळपास ४० टक्क्याने वाढ होते. याठिकाणी या व्यवसायासाठी लागणाऱ्या रिकाम्या पेट्यांचीसुद्धा विक्री मोठ्या प्रमाणात होते.
यावर्षी अत्यंल्प पावसामुळे मधमाशा पालन व्यवसायावर विपरित परिणाम होत आहे. मागील वर्षी पुरामुळे तर यावर्षी पाऊस नसल्याने हा व्यवसाय अडचणीत आला आहे. मागील वर्षी पुरामुळे पेट्या वाहून गेल्या. वसाहती पकडून मधपेट्या भरण्यास बहुतेकांकडे रिकाम्या मधपेट्या उरलेल्या नाहीत. शासनाकडून नुकसान भरपाईही नाही. या उलट या व्यवसायाबाबत शासनाकडे नुकसानभरपाईची तरतूदच नसल्याचे सांगण्यात येते. शेतीचा उत्तम जोडधंदा म्हणून नुकसान भरपाईची शासनाने तरतूद करावी, अशी मागणी येथील मधपाळ संजय कोलते, होमेश्वर वाढई, उत्तम काकडे, गोवर्धन शेंडे, सुभाष आसूटकर, नेना पिंपळशेंडे, रवींद्र तरारे, प्रज्वल काकडे, संजय मत्ते, विनोद कोलते तसेच सरपंच विजय तरारे, ग्रामस्थ महादेव कोल्हे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)