११ वाजूनही कार्यालय बंदच !
By Admin | Published: June 18, 2016 12:33 AM2016-06-18T00:33:53+5:302016-06-18T00:33:53+5:30
गाव खेड्यात विकासाची गंगा पोहोचविणाऱ्या पंचायत समिती कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांची कशी होरपळ होते,
जिवती पंचायत समिती : पदाधिकारी-अधिकारी गायब
शंकर चव्हाण जिवती
गाव खेड्यात विकासाची गंगा पोहोचविणाऱ्या पंचायत समिती कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांची कशी होरपळ होते, याचे उत्तम उदाहरण ‘लोकमत’ने सोमवारी केलेल्या स्टींग आॅपरेशन दरम्यान दिसून आले. सकाळचे ११ वाजूनही कार्यालय कुलूपबंद अवस्थेत होते. त्यामुळे येथील पंचायत समिती कार्यालयाचे पितळ उघडे पडले आहे.
शासनाने कामचुकार अधिकाऱ्यावर लगाम लावण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात बॉयोमेट्रीक मशिन लावली आहे. जेणेकरून कार्यालयातील कर्मचारी वेळेवर येतील आणि लोकांचे कामेसुद्धा वेळेवर होतील, हा शासनाचा उद्देश होता. मात्र या उद्देशालाच हरताळ फासली जात असल्याचा प्रकार येथे पहायला मिळला.
कार्यालयात लावण्यात आलेली बॉयोमेट्रीक मशिन बंद पडली आहे. तर अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांवर वचक नाही. प्रशासनात ताळमेळ नाही.यामुळे कर्मचारी कधीही येवून आपल्या सह्या करीत असल्याचा प्रकार येथे दिसून आला. गेल्या अनेक दिवसांपासून पहाडावरील अनेक गावगुडे पाणी टंचाईने होरपळत आहेत.
पाण्याची सोय करून द्या, बंद पडलेले पाण्याचे स्त्रोत चालू करा, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. मात्र या तक्रारी फाईल बंद पडल्या आहेत. याबाबत पाणी टंचाई विभागाच्या लिपीकाला नागरिक वारंवार विचारतात. पण समाधानकारक उत्तर कधीच मिळत नाही. कार्यालयात कर्मचारी लवकर येत नाही व लोकांची कामेही करीत नसल्याची ओरड सुरू आहे. हा प्रकार पाणी टंचाई विभागाच्या कर्मचाऱ्यांचाच नव्हे तर बहुतांश कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे. मात्र हे सर्व घडत असताना लोकप्रतिनिधी मात्र मुग गिळून बसले आहेत. तर काही प्रतिनिधी आपली पॉवर दाखवित खिशा गरम करीत असल्याचीही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन संबधींतावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
लोकप्रतिनिधीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
पंचायत समिती लोकप्रतिनिधीच्या देखरेखीखाली जनतेची कामे सुलभ पद्धतीने व्हावी, अशी जनतेची मापक अपेक्षा असते. पण तसे कधी झाले नाही. तक्रार केली की त्याला, लगेच पदाधिकारी आपल्या कॅबीनमध्ये बोलावतात. त्यांना काही सूचना देत आपल चांगभल करून घेतात. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी सुद्धा अधिकाऱ्यांच्या विरोधात जात नाही.
स्वच्छतेची एैसीतैसी
कार्यालय व परिसर स्वच्छ रहावे, जेणेकरून डासाची उत्पत्ती होणार नाही, यासाठी प्रत्येक गावात पंचायत समिती व ग्राम पंचायत अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. पण लोकांना ज्ञान देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपल्याच कार्यालयाचा अंधार मात्र झाकून ठेवला आहे. शौचालयात पाण्याची सोय नाही, परिसर स्वच्छ नाही. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून खर्रा व तंबाखूच्या पिचकारीने भिंती रंगल्या आहेत.