मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे दफ्तर दिरंगाई
By admin | Published: November 28, 2015 02:11 AM2015-11-28T02:11:53+5:302015-11-28T02:11:53+5:30
कोरपना तालुक्यातील बहुतेक शासकीय कर्मचारी हे नोकरीच्या ठिकाणी अर्थात मुख्यालय स्थायीक नसून इतर तालुक्यातून अप-डाऊन करीत असतात.
अनेक कामांचा खोळंबा : वणी व राजुरातून कर्मचारी करतात अप-डाऊन
कोरपना : कोरपना तालुक्यातील बहुतेक शासकीय कर्मचारी हे नोकरीच्या ठिकाणी अर्थात मुख्यालय स्थायीक नसून इतर तालुक्यातून अप-डाऊन करीत असतात. यामध्ये डॉक्टर, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षकांपासून सर्वच क्षेत्रातील सरकारी कर्मचाऱ्याचा समावेश आहे. त्यामुळे अनेक कामांचा खोळंबा होत असून नागरिकांना विविध कामे करण्यासाठी कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
सहाव्या वेतन आयोगामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना दरमहा मोठ्या पगाराची मिळकत होत असल्याने त्यांचे राहणीमान निश्चितच उंचावले आहे. ही बहुतेक मंडळी आपली कुटूंबे पॉश शहरात वास्तव्यास ठेवून दुचाकी वाहनाने ३० ते ४० किमी अंतरावरील आपल्या नोकरीच्या ठिकाणी हजेरी लावत असतात. अशा दैनंदिन प्रवाशी कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे आढळून येते. यात शिक्षक वर्ग आघाडीवर असून कोरपना व परिसरातील गावात नोकरीवर असणारे शिक्षक थेट वणी, यवतमाळ, राजूरा व गडचांदूर येथून ये-जा करणारे आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांना शासन घरभाडे भत्ता देत असते. मात्र या भत्त्यास सदर कर्मचारी खरोखरच पात्र आहेत काय, याची शहानिशा करणे येथील वरिष्ठ अधिकारी महत्त्वाचे समजत नाही. किंबहुना, कोरपनाचे वरिष्ठ अधिकारी स्वत:च मुख्यालयी वास्तव्यास राहत नसल्याचा आक्षेप आहे. त्यामुळे ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा हा प्रकार तालुक्यात सुरू आहे.
दरम्यान, कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने त्यांच्या कामातील दिरंगाई वाढत आहे. ही बाबसुद्धा वरिष्ठ अधिकारी दुर्लक्षित करीत आहेत. कोरपना तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तर चक्क एक चार चाकी वाहनच भाड्याने घेतल्याचे समजते. ही सर्व मंडळी राजुरा ते कोरपना असा सुमारे ४५ किमीचा रोज प्रवास करीत असतात. मुख्यालयी वास्तव्यास नसतानाही त्यांना नियमित घरभाडे भत्ता अदा होत असल्याची माहिती आहे. हे सारे येथील तहसिलदारांना माहित असूनही त्यांना घरभाडे मिळते कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
तलाठी सारख्या महत्त्वाच्या पदावर असणारे कर्मचारीसुद्धा बाहेर गावाहून ये-जा करतात. तलाठी साहेबकधी घरून निघालेले असतात मात्र, कार्यालयात पोहचलेले नसतात. दुसरीकडे कार्यालयातूनच आताच बाहेर गेल्याचे सहकारी सांगतात. अशा वेळी गरजुवंतांना सतत हेलपाटे खावे लागतात. या हेलपाट्या व्यतिरिक्त कामाचा मोबदला म्हणून द्यावी लागणारी ‘दक्षिणा’ ती वेगळीच. अर्थात याला येथील काही तलाठी अपवादही आहेत. मात्र त्यांची संख्या नगण्य आहे. (तालुका प्रतिनिधी)