पंचायत समिती कार्यालय ओस
By Admin | Published: January 12, 2017 12:37 AM2017-01-12T00:37:24+5:302017-01-12T00:37:24+5:30
सिंदेवाही पंचायत समिती कार्यालयात नागरिक, शेतकरी व लाभार्थ्यांची कामे होत नाहीत.
सिंदेवाही : सिंदेवाही पंचायत समिती कार्यालयात नागरिक, शेतकरी व लाभार्थ्यांची कामे होत नाहीत. अधिकारी व कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याने खोळंबत आहे, अशी लाभार्थी नागरिकांमध्ये चर्चा होती. ‘लोकमत’ने स्ट्रिंग आॅपरेशन राबवित सिंदेवाही पंचायत समिती कार्यालयाला भेट दिली. कार्यालयीन वेळेत कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या दिसल्या.
या सर्व प्रकारामुळे पंचायत समिती कार्यालय ओस पडल्याचे दिसून आले. येथील पंचायत समितीची स्थापना १९६४ मध्ये झाली. त्याला ५३ वर्षाचा कालावधी होत आहे. सद्यास्थितीत पंचायत समिती कार्यालयाची इमारत जीर्ण झाली आहे. सध्या त्या जीर्ण इमारतीत पंचायत समितीचे कार्यालय सुरू आहे. या कार्यालयात अधीक्षक, लेखापाल, कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी व कर्मचारी यांचे स्वतंत्र खोल्यामध्ये बसण्याची व्यवस्था आहे. तसेच शिक्षण विभाग, कृषी विभाग, पंचायत विभाग कार्यालय पंचायत समिती परिसरात वेगवेगळ्या इमारतीमध्ये सुरू आहेत. लोकमत प्रतिनिधीने पंचायत समिती कार्यालयाला भेट दिली असता सदर बाब लक्षात आली. या कार्यालयात संवर्ग विकास अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. सध्या प्रभारी संवर्ग विकास अधिकारी म्हणून श्याम बोकडे कार्यरत आहे. पंचायत समिती कार्यालयात कुणीही अधिकारी दिसले नाही म्हणून चौकशी केली असता प्रभारी संवर्ग विाकस अधिकारी दौऱ्यावर असल्याचे सांगण्यात आले. या कार्यालयातील आस्थापना विभाग ८, पंचायत विभाग २, शिक्षण विभागात ६२ शिक्षक मिळून एकूण ७२ पदे रिक्त आहेत.
घरकूल योजना, विहीर बांधकाम, कृषी योजनेचे लाभार्थी व खेडे गावातून कामासाठी आलेल्या नागरिकांना दिवसभर ताटकळत राहावे लागते. जनतेचे काम करणारेच आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडीत नसेल तर सामान्य जनतेने काय करावे, असा प्रश्न निर्माण होत आहे. (पालक प्रतिनिधी)