अधिकाऱ्यावर 'हनी ट्रॅप'; मागितली ५० लाखांची खंडणी; असा रचला कट, अखेर..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2022 12:12 PM2022-12-01T12:12:37+5:302022-12-01T12:19:19+5:30
पाच जणांवर गुन्हा, दोघांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
चंद्रपूर : बेडरूममध्ये एका महिलेसोबत छुप्या कॅमेऱ्याने चित्रफित बनवून एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडून तीन लाख वसूल केले. मात्र, पुन्हा पैशाची लालसा जागृत झाल्याने ५० लाखांची खंडणी मागितली. ही रक्कम आवाक्याच्या बाहेर असल्याने संबंधित अधिकाऱ्याने पोलिसांचे दार ठोठावले. स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अधिकाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकविणाऱ्या टोळीलाच बुधवारी जाळ्यात अडकविले.
या प्रकरणी चंद्रपूर शहर पाेलिस ठाण्यात तीन महिलांसह पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. सादीक खान रसिक खान पठाण (३५, रा. दुर्गापूर) व झिबल भारसाखरे (६०, रा. चंद्रपूर) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहे.
चंद्रपुरातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला काही महिन्यांपूर्वी झिबल भारसाखरे याने त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या फ्लॅटवर बोलविले होते. दरम्यान, अन्य महिलांसोबत संबंधित अधिकाऱ्याची बेडरूममध्ये छुपा कॅमेरा लावून चित्रफित तयार केली. अशा पद्धतीने अधिकारी ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकला. ही चित्रफित त्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला पाठवून ती व्हायरल करण्याची धमकी देत तीन लाख रुपये उकळले. झिबलच्या पत्नीने ही चित्रफित सादिक खान याला पाठवून त्या अधिकाऱ्याला खंडणी मागण्याचे सांगितले. सादीकने नवा सीम खरेदी करून चित्रफितीचा स्क्रीनशाॅट पाठविला. त्यानंतर त्याने थेट त्या अधिकाऱ्याला कार्यालयात गाठून चक्क ५० लाखांची खंडणी मागितली.
एवढी मोठी रक्कम आणायची कोठून या विवंचनेत त्याने थेट पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्याकडे धाव घेतली. पोलिस अधीक्षकांनी सदर प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्याकडे चौकशीसाठी पाठविले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून मंगळवारी ३० हजार रुपये रोख व पाच लाख रुपयांचा धनादेश घेताना सादीकला खानला रंगेहात अटक करण्यात यश मिळविल्याने हनी ट्रॅपचा हा धक्कादायक प्रकार पुढे आला.
आतापर्यंत किती जणांचा झाला हनी ट्रॅप?
या टोळीने अशाप्रकारे आता किती जणांना हनी ट्रॅपमध्ये अडकविले, याचा तपास पोलिस घेणार असल्याचे समजते. मात्र, अनेकजण भीतीपोटी तक्रार देण्यास कचरत असल्याची माहिती पोलिस सूत्राने दिली. मात्र, फसवणुकीसाठी स्वत:ला वाचविण्याकरिता पोलिसांकडे धाव घ्यावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी केले आहे.