जुना कुनाडा कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांनी केली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 12:32 AM2017-11-02T00:32:50+5:302017-11-02T00:33:01+5:30
वेकोलि जुना कुनाडा परियोजना माजरी क्षेत्राद्वारे हेतुपुरस्परपणे प्रकल्पग्रस्तांना नोकरीपासून वंचित ठेवल्यामुळे या अन्यायाच्या विरोधात प्रकल्पग्रस्तांनी बुधवारी जुना कुनाडा कोळसा खाण बंद आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : वेकोलि जुना कुनाडा परियोजना माजरी क्षेत्राद्वारे हेतुपुरस्परपणे प्रकल्पग्रस्तांना नोकरीपासून वंचित ठेवल्यामुळे या अन्यायाच्या विरोधात प्रकल्पग्रस्तांनी बुधवारी जुना कुनाडा कोळसा खाण बंद आंदोलन केले. सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत वेकोलिचे कोळसा व माती वाहून नेणारे वाहने आंदोलनकर्त्यांनी बंद ठेवली होती.
भद्रावती पोलिसांच्या मध्यस्थीने सबएरिया मॅनेजर, चारगाव (कुनाडा) यांच्या कार्यालयात वेकोलि अधिकारी व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्यात मागण्यांच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. याप्रसंगी एरिया प्लॅनिंग आॅफीस, कुचना पवार, निखिल कुमार व सबएरिया मॅनेजर चारगावतर्फे सब एरिया मॅनेजर पंकज कुमार तसेच प्रकल्पग्रस्त पांडूरंग महाजन, मनोज मंदे, निलेश नागपुरे, रामनाथ आसुटकर, डोमा कावरी, पंढरी कावटी चर्चेदरम्यान उपस्थित होते.
जुना कुनाडा प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळण्याबाबत प्रश्न विचारला असता, या प्रकल्पाला २००० ची पॉलिसी लागू असल्याने तीन एकर पेक्षा कमी शेती असल्याने या पॉलिसीत नोकरी मिळू शकत नाही, असे वेकोलितर्फे सांगण्यात आले.
२०१२ च्या पॉलिसीनुसार वेकोलि अनुदान द्यायला तयार आहे. तर त्या पॉलिसीनुसार नोकरीही देण्यात यावी, असे प्रकल्पग्रस्त म्हणाले. कोल इंडियाच्या लिब्रलायझेशन पॉलिसीमध्ये फक्त अनुदान ५ लाख रुपये प्रति एकर देण्याचे प्रावधान असल्याचे वेकोलिने सांगितले.
वेकोलिच्या नियमात तीन एकर पेक्षा कमी शेती असणाºया प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळत नसल्यास जमिनी शेती करण्यायोग्य करून द्याव्या व आजपर्यंतची नुकसान भरपाई वेकोलिने द्यावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली. ८ नोव्हेंबर पर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीबाबत मागण्या मान्य न झाल्यास १० नोव्हेंबरपासून तीव्र आंदोलन करणार, असे प्रकल्पग्रस्तांनी वेकोलि अधिकाºयांना सांगितले. ठाणेदार बी. मडावी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक महेंद्र इंगळे, नरेश शेरकी, रवी दुर्गे, भीमराव पडोळे, दिनेश सूर्यवंशी यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.